मी शिष्यवृत्ती आणि कर्जाची कागदपत्रे दाखवायला तयार, ‘सम्राट’ त्यांची खरी पदवी दाखवतील काय? दीपकेंचा मोदींवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी माझ्या शिक्षणासाठी मिळालेल्या स्कॉलरशिपचे आणि लोनचे कर्जाचे लेटर दाखवायला कधीही तयार आहे. पण सम्राट त्यांची खरी पदवी दाखवतील काय, अशा शब्दांत ‘कॉक्रोच’ जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच थेट हल्ला चढवला.

गुजरातमधील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने अभिजीत दिपके यांच्या वडिलांच्या उत्पन्नाबाबत महाराष्ट्र सरकारकडे तक्रार दाखल केली आहे. मर्यादित पगारात निवृत्त शासकीय कर्मचारी असणाऱया भगवानराव दिपके यांनी मुलाचा अमेरिकेतील उच्च शिक्षणाचा खर्च कसा उचलला, याची आर्थिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर आक्रमक प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी थेट सम्राट त्यांची डिग्री दाखवतील का? अशी एक्स पोस्ट करत पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य केले.

माझ्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित करणाऱयांनी आणि मला लक्ष्य करणाऱयांनी हे लक्षात ठेवावे की, माझे शिक्षण परदेशात झाले असून त्यासाठी लागणाऱया शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाचे सर्व अधिकृत पुरावे माझ्याकडे आहेत. ज्यांना जी काही चौकशी करायची आहे ती त्यांनी खुशाल करावी. जर तुम्ही माझ्याकडे ईडी किंवा सीबीआय पाठवत असाल, तर त्यासोबत पंतप्रधानांची पदवीही पाठवून द्या, असा टोला अभिजीत दिपके यांनी लगावला.

 सध्या अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांच्या कारभाराला जनता पंटाळली असून लोकांमध्ये मोठी निराशा आहे. मात्र सध्या नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. आजच्या राजकीय वातावरणात नवीन पक्ष काढून काय साध्य होणार, असा सवाल दीपके यांनी केला.

 आज देशातील मतदान प्रक्रियेवरच जनतेच्या मनात शंका आहे. नागरिक एका पक्षाला मतदान करतात, पण निवडून आलेले नंतर पक्ष बदलतात. केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून पक्ष पह्डले जात आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाऐवजी एका सक्षम जनआंदोलनाच्या स्वरूपातच काम करण्याचा मानस असल्याचे दीपके म्हणाले.

सरकारच्या विरोधात बोलले किंवा प्रश्न विचारले जातात तेव्हा त्यांचा आवाज दाबण्यासाठी ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणा मागे लावतात. आताही तेच सुरू आहे.

खासदार-आमदार विकत घ्यायला कोटय़वधी रुपये, विद्यार्थ्यांसाठी नाहीत

नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी आम्ही केली आहे. पण अद्याप कोणालाच नुकसानभरपाई मिळालेली नाही. सरकारने नियम आणि कायदा पाहून निर्णय घेऊ असे म्हटले आहे. खासदार-आमदार विकत घ्यायला कोटय़वधी रुपये असतात, पण आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देताना नियम बघतात. याचा अर्थ हेतू योग्य नाही, असे अभिजीत दीपके म्हणाले.

उद्या बैठक

‘कॉक्रोच’ जनता पाटीची अत्यंत महत्त्वाची बैठक 5 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे अधिकृत प्रवत्ते आणि कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील. संघटनेचा पुढील अजेंडा काय असावा आणि कोणती लोकहितवादी ध्येय-धोरणे घेऊन पुढे जायचे, यावर या बैठकीत सविस्तर मंथन केले जाईल, असे अभिजीत दीपके यांनी सांगितले. झारखंडमध्ये पेपर फुटीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सीजेपीचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.