ई-20 विरोधातील अडीच लाख निवेदने घेऊन आज मोदींच्या घरावर मोर्चा, केजरीवाल यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेपरफुटीविरोधातील आक्रोश शमत नाही तोच मोदी सरकारच्या ई-20 धोरणाला देशभरातून विरोध वाढू लागला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाला विरोध करणाऱ्या ऑनलाईन याचिकेवर अडीच लाख लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या याचिकांचे गठ्ठे घेऊन आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे 100 लोकांसह मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत.

केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली. केंद्र सरकारच्या ई-20 धोरणाविरोधात नुकतीच आम आदमी पक्षाने टाऊन हॉल परिषद घेतली होती. या परिषदेला 7 लाख लोकांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. लोकांचा हा विरोध सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय केजरीवाल यांनी घेतला आहे. ‘ई-20 धोरणासंबंधी चर्चा करण्यासाठी वेळ द्या,’ अशी विनंती मी पंतप्रधानांना महिनाभरापूर्वी पत्राद्वारे केली होती. मात्र त्या पत्राला अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन आणि त्यांना निवेदने देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले. हा कुठल्याही एका पक्षाचा कार्यक्रम नाही. माझ्यासोबत येणारे पीडित आहेत. ते पक्षातील आणि पक्षाबाहेरील असू शकतात, असे केजरीवाल म्हणाले.

ट्रम्प यांच्या दबावामुळे इथेनॉलची बळजबरी

‘‘इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे देशातील जनता प्रचंड त्रस्त आहे. गाडय़ांचे मायलेज कमी होत आहे. गाडय़ा खराब होत आहेत. यामागे नक्कीच सरकारचा काही ना काही छुपा अजेंडा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे मोदी झुकले आहेत. ट्रम्प यांना अमेरिकेतील इथेनॉल बळजबरी हिंदुस्थानात निर्यात करायचे आहे. पुढच्या पाच वर्षांत 20 बिलियन डॉलर्सचे इथेनॉल आयात केले जाणार आहे,’’ असा दावा केजरीवाल यांनी केला.