मध, गायीच्या तूपासह Dabur ला अनेक अन्नपदार्थ ‘१०० टक्के’च्या दाव्यांसह विक्री करता येणार नाही; एफएसएसएआयचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fssai dabur

अन्न सुरक्षा नियामक संस्था ‘एफएसएसएआय’ने डाबर इंडियाला मध, गायीचे तूप आणि खाद्यतेलांसह अनेक अन्नपदार्थांवर ‘१०० टक्के’ असे दावे करून त्यांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. अशा प्रकारचे लेबलिंग कायद्याच्या विरोधात असल्याचे एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे.

सोमवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) माहिती दिली की, दिशाभूल करणारे ‘१०० टक्के’ दावे असलेली अन्न उत्पादने विकल्याप्रकरणी डाबर इंडिया लिमिटेडविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. या उत्पादनांमध्ये मध, ॲपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गायीचे तूप, नारळपाणी, नारळाचे दूध आणि तत्सम उत्पादनांचा समावेश आहे. पीटीआयने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.

उल्लंघनाचा तपशील देताना एफएसएसएआयने सांगितले की, कंपनीच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या अन्नपदार्थांवर ‘१०० टक्के नैसर्गिक’, ‘१०० टक्के शुद्ध’, ‘१०० टक्के शुद्धतेची हमी’, ‘१०० टक्के सेंद्रिय’ आणि ‘१०० टक्के कोवळ्या नारळाचे पाणी’ असे दिशाभूल करणारे दावे करण्यात आले होते.

‘१०० टक्के’ अशा प्रकारच्या दाव्यांचा वापर अन्न सुरक्षा आणि मानके (जाहिरात व दावे) नियमावली, २०१८ च्या विरोधात असल्याचे नियामक संस्थेने स्पष्ट केले. हे दावे संदिग्ध, पडताळणी न करता येण्यासारखे असून ग्राहकांची दिशाभूल करण्याची शक्यता असल्याचे एफएसएसएआयने म्हटले.

‘आम्हाला एफएसएसएआयची नोटीस प्राप्त झाली असून, त्यामध्ये नमूद केलेल्या आमच्या संकेतस्थळावरील मजकुराची आम्ही पडताळणी करत आहोत’, असे डाबर इंडियाने एका निवेदनात म्हटले.

डाबर हिमालयन ऑर्गेनिक ॲपल सायडर व्हिनेगर आणि डाबर ऑर्गेनिक हनी या उत्पादनांवर वैध एफएसएसएआय सेंद्रिय मान्यता नसतानाही ‘जैविक भारत’चा लोगो वापरण्यात आल्याचे आढळून आले.

याशिवाय, डाबर होममेड कोकोनट मिल्क या उत्पादनाची ‘१०० टक्के शुद्धता’ असा दावा करून विक्री केली जात होती.

अन्न सुरक्षा आणि मानके (जाहिरात व दावे) नियमावली, २०१८ नुसार मिश्र स्वरूपाच्या अन्नपदार्थांसाठी असा दावा करण्यास परवानगी नाही.

एफएसएसएआयने सांगितले की, यापूर्वीही डाबरला दिशाभूल करणारे ‘१०० टक्के’ दावे तात्काळ बंद करण्याचे निर्देश देत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, डाबरकडून समाधानकारक सुधारात्मक कारवाई करण्यात आली नाही.

‘एफएसएसएआयने डाबर इंडिया लिमिटेडला नोटिशीत नमूद करण्यात आलेल्या तसेच दिशाभूल करणारे ‘१०० टक्के’ दावे असलेल्या इतर सर्व अन्नपदार्थांची विक्री तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले असून, १५ दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल (Action Taken Report – ATR) सादर करण्यास सांगितले आहे’, असे नियामक संस्थेने म्हटले.

गेल्या काही महिन्यांपासून एफएसएसएआय विविध अन्न व्यवसायिकांवर करण्यात आलेल्या अंमलबजावणी कारवायांची तसेच त्यांच्या ऑनलाइन मार्केटप्लेसवर ही उत्पादने विकणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांविरोधातील कारवाईची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना देत आहे.

अनेक मद्यनिर्मिती कंपन्या आणि ऊर्जा पेय उत्पादक कंपन्याही एफएसएसएआयच्या कारवाईच्या कक्षेत आल्या आहेत.