म्हसळ्यात शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा घराघरांत, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा घराघरांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांच्या संकल्पनेतून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत शिवसेनेसाठी तन मन धनाने योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा शाल, श्रीफळ व शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या जाज्वल्य विचारांतून तीन पिढ्या घडल्या. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांतील घराघरांत लावण्याचा संकल्प दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांनी सोडला आहे. शिवसेना स्थापनेच्या काळात आणि त्यानंतर गावाखेड्यात शिवसेनेसाठी बेधडक काम केलेल्या पहिल्या व दुसऱ्या पिढीतील ज्येष्ठ शिवसैनिकांचा शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. म्हसळा तालुका युवाधिकारी कौस्तुभ करडे यांच्या पुढाकाराने या सन्मान
सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

ज्येष्ठ शिवसैनिकांनी संघटनेचा पाया भक्कमपणे रचला म्हणून त्या कृतज्ञतेपोटी त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती कौस्तुभ करडे यांनी दिली. यावेळी शिवसैनिक नरेश विचारे, शहर युवाधिकारी अंकुश नटे, उपशहर युवाधिकारी स्वानंद बोरकर, युवासैनिक अक्षय जंगम, निष्ठावंत शिवसैनिक बेटकर उपस्थित होते.