
गेल्या महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघर तसेच वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्तांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती भांडी, कपडे, पशुधन यांच्या नुकसानीपोटी तसेच दुकानदार, टपरीधारक यांनाही मदत दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ जुलै रोजीच्या बैठकीत पालघर जिल्ह्यात पूरपस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदत घोषित केली. त्यानुसार पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबाला कपड्यांच्या नुकसानीसाठी १० हजार तसेच घरगुती भांडी आणि वस्तू यांच्या नुकसानीपोटी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या अथवा कच्च्या घरासाठी दीड लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी १५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत मदत घोषित करण्यात आली आहे. तर नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी प्रति झोपडी १५ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.



























































