नदी ओलांडण्यासाठी बांधलेला सरकारी पूल वाहून गेला, उंबरवीरा आदिवासींच्या आयुष्याचा दोरीवर तोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<अरुण नलावडे>>

मुंबईपासून जवळ असलेल्या खालापूर तालुक्याच्या उंबरवीरा ठाकूरवाडीतील आदिवासींना रोज मरणयातना भोगाव्या लागत आहेत. नदी ओलांडण्यासाठी बांधलेला सरकारी पूल वर्षभरातच वाहून गेला आहे. त्यामुळे येथील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, महिला यांना चक्क दोरीचा आधार घेत नदी पार करावी लागत आहे. आदिवासींच्या आयुष्याचा दोरीवर तोल असून तो सांभाळण्यासाठी त्यांना तारेवारची कसरत करावी लागते. दोरी तुटली तर नदीत थेट जलसमाधी मिळणार असून लवकरात लवकर नवा पूल उभारावा, अशी मागणी आदिवासींनी केली आहे.

मुंबई-पुणे महानगरांना जोडणाऱ्या बोरघाटातील जांबरुंग केबीनजवळ उंबरवीरा ठाकूरवाडी आहे. येथील लोकवस्ती जेमतेम अडीचशेची. सरकारने साकव बांधला, परंतु हा पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेला. नदी तसेच ओहळाला पूर आला तर आदिवासींना रोजीरोटीला मुकावे लागते. परिणामी उपासमारीची पाळी त्यांच्या कुटंबावर आली आहे.

२५० लोकसंख्या असलेल्या उंबरवीरा ठाकूरवाडीतील महिला व पुरुषांना दोरीचा आधार घेऊन नदी पार करावी लागत आहे. खालापूरच्या ठाकूरवाडीत जीवावरचा प्रवास उंबरवीरा ठाकूरवाडीमध्ये वीसहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. पण पूलच नीट नसल्याने त्यांना नजीकच्या शाळेत जाता येत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी दुसऱ्या गावांमधील आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या पहिल्याच पावसामध्ये येथील पूल वाहून गेला होता. स्थानिकांनी वारंवार मागणी करूनही अजूनपर्यंत नवा पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही आणखी किती काळ हाल सहन करणार, असा सवाल आदिवासींनी केला आहे.

तत्काळ उपाययोजना करा
पुलाच्या दुर्दशेबाबत बिड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कैलास दिसले यांनी पंचायत समिती उपसभापती भाई शिंदे यांची भेट घेऊन त्यांना दुरुस्तीबाबत साकडे घातले. दरम्यान या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. आदिवासी पाड्याला भेट देऊन तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.