
आता बॉलीवूडलाही चित्रपटांतील महत्त्वाची दृश्ये आणि टिझर-ट्रेलर लीक होण्याचा फटका बसू लागला आहे. बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाचा टिझर जुलै महिन्यात सलग तीन वेळा लीक झाल्यानंतर निर्माते आता सावध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटांच्या प्रमोशनची संपूर्ण रणनीती बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी काळात ‘दृश्यम-3’, ‘वाराणसी’, ‘स्पिरीट’ आणि ‘टॉक्सिक’ यांसारख्या मोठय़ा बजेटच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीमध्येही मोठे बदल दिसू शकतात.
विशेष म्हणजे ‘रामायण’च्या अधिकृत ट्रेलरच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी पहाटेची वेळ निवडली. अधिकृत कारण म्हणून चित्रपटाचा आध्यात्मिक विषय आणि शुभ मुहूर्त सांगण्यात आला असला, तरीही चर्चेनुसार टिझर लीकच्या अनुभवामुळेच निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’चा टिझर 19 जुलैला दिल्लीतील ‘प्रथम संकल्प’ कार्यक्रमानंतर प्रथमच ऑनलाईन लीक झाला होता. कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांसाठी दाखवण्यात आलेला सुमारे 1 मिनिट 28 सेपंदांचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात रामाची एंट्री, व्हीएफएक्स आणि काही महत्त्वाची दृश्ये होती. त्यानंतर 24 जुलैला अधिकृत डिजिटल प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आणि 25-26 जुलैदरम्यान आणखी काही क्लिप्स सोशल मीडियावर समोर आल्या. सलग घडलेल्या या प्रकारामुळे निर्मात्यांनी अधिकृत ट्रेलरच्या प्रदर्शना वेळी वेळ, ठिकाण आणि संपूर्ण कार्यक्रमाबाबत अत्यंत गोपनीयता बाळगली.
बॉलीवूडमधील प्रमुख निर्मिती संस्था आणि प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळणाऱया पंपन्यांमध्ये नव्या प्रमोशन धोरणावर चर्चा सुरू आहे. अधिकृत टिझर आणि ट्रेलरचे नियोजन, जागतिक स्तरावर एकाच वेळी प्रदर्शन, कार्यक्रमाची वेळ आणि सुरक्षेचे उपाय यावर विशेष भर दिला जात असल्याची माहिती एका ख्यातनाम निर्मिती संस्थेतील सूत्राने ‘सामना’शी बोलताना दिली. यासोबतच खास स्क्रीनिंगदरम्यान मोबाईलवर कडक निर्बंध, उपस्थितांकडून गोपनीयता करार करून घेणे तसेच दृश्ये लीक झाल्यास कायदेशीर कारवाईची तयारीही अनेक निर्मिती संस्था करत असल्याचे समजते.
































































