
नालेसफाईत झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी महापौर विनायक कोंड्याल यांना लक्ष्य केले. याप्रकरणी भाजपाचे आमदार देशमुख गटाच्या ३० नगरसेवकांनी आयुक्तांना निवेदन देत बंडाची तयारी केली आहे.
सोलापूर महापालिकेत अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकाऱ्यांनी नालेसफाईत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे गटाचे महापौर विनायक कोंड्याल यांना लक्ष्य करत देशमुख गटाच्या नगरसेवकांनी लक्ष्यवेधी ठरावाद्वारे नालेसफाईतील भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. सभेत सत्ताधाऱ्यांमध्येच खडाजंगी होऊन प्रचंड वाद झाल्याने पालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान, या भ्रष्टाचारप्रकरणी प्रभारी नगर अभियंता सारिका आकुलवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. या चौकशीदरम्यानच भाजपातील काही पदाधिकाऱ्यांनी आकुलवार यांच्याकडे पुन्हा नगर अभियंत्याचा पदभार देण्याचा घाट घातल्याने संतप्त झालेल्या आमदार विजय देशमुख गटाच्या ३०हून अधिक नगरसेवकांनी आयुक्त ओम्बासे यांना निवेदन देत आकुलवार यांच्याकडे पदभार देण्यास विरोध केला. तसेच चौकशी निःपक्षपातीपणे न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशाराही दिला.
महापालिकेत भाजपाचे आमदार कोठे व आमदार देशमुख गटाचे नगरसेवक हे अनेक मुद्द्यांवरून आमने-सामने येत असल्याने भाजपातील खदखद वारंवार बाहेर पडत आहे. महापौर कोंड्याल यांना नालेसफाईतील भ्रष्टाचारावरून लक्ष्य करण्यात येत असून, आमदार देशमुखसमर्थक नगरसेवक आता उघडपणे मैदानात उतरले आहेत. नालेसफाई कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देशमुख समर्थक नगरसेवक अनंत जाधव यांनी केला असून, आयुक्तांकडे पुराव्यानिशी तक्रार दिली आहे. यावेळी भाजपाचे नगरसेवक शिवानंद पाटील, राजकुमार पाटील, संजय कोळी, काशिद गायकवाड, वडताल यांच्यासह ३०हून नगरसेवक उपस्थित होते.



























































