एक्सप्रेसवेवर दरोडेखोरी, दगडफेक, हल्ले, लुटमारीने चालकांत दहशत कळंबोली-खालापूर पट्टा डेंजरझोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरोडेखोरांनी सध्या धुमाकूळ घातल्याने वाहनचालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दरोडेखोर दगडफेक करून वाहन थांबवतात आणि त्यानंतर चालकांना बेदम मारहाण करून लुटमारी करीत आहेत. लुटमार आणि दरोडेखोरीचे सर्वात जास्त प्रकार कळंबोली-खालापूर पट्ट्यात घडत असल्याने हा पट्टा डेंजर झोन बनला आहे.

 

कळंबोली सर्कल ते खालापूर टोलनाक्यादरम्यान लुटमारीचे प्रकार वाढल्याने वाहनचालकांनी या मार्गाला ‘चोरीचा महामार्ग’ अशी उपमा दिली आहे. अमिटी विद्यापीठ परिसर, भाताण बोगदा आणि कोन गाव एक्झिट हे दरोडेखोरांचे प्रमुख अड्डे बनले आहेत. रात्री उशिरा किंवा पहाटे वाहतूक कमी होताच टोळ्या सक्रिय होतात.

 

मालवाहू ट्रक, कंटेनर, खासगी चारचाकी तसेच व्यावसायिक वाहने हेरून त्यांच्यावर अचानक दगडफेक केली जाते. वाहनाच्या काचा फुटल्यानंतर किंवा चालक घाबरून वाहन थांबवताच चार ते सहा जणांची टोळी वाहनात घुसून चालकाला मारहाण करते. त्यानंतर गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटून दरोडेखोर पसार होत आहेत.

पुणे येथून ट्रक घेऊन मुंबईकडे येत असलेले अर्जुन यादव यांच्या वाहनावर दरोडेखोरांनी दगडफेक केली. दगड त्यांच्या हाताला आणि गालाला लागल्याने त्यांनी वाहन थांबवले. त्याच क्षणी चार जण ट्रकमध्ये घुसले. त्यांनी यादव यांना मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे पाच हजार रुपये रोख, सोन्याची बाली आणि इतर वस्तू लुटून पलायन केले.