
रॅपिडोवरून बुक केलेल्या रिक्षा चालकाने प्रवासादरम्यान अश्लील व्हिडीओ पाहत हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आसाममधील संशोधक आणि डिजिटल क्रिएटर सुकन्या दत्ता यांनी त्यांच्यासोबत दिल्लीत घडलेला हा भयानक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या प्रकरणी रेपिडो कंपनीने संबंधित चालकाला प्लॅटफॉर्मवरून कायमस्वरूपी काढून टाकले आहे.
दिल्लीत राहणाऱ्या सुकन्या दत्ता यांनी रात्री 8.48 च्या सुमारास सफदरजंग ते मॉडेल टाऊन असा प्रवास करण्यासाठी रेपिडो रिक्षा बुक केली होती. सुरुवातीला प्रवास नेहमीप्रमाणे सुरू होता. मात्र एका ट्रॅफिक सिग्नल रिक्षा थांबल्यानंतर रिक्षा चालकाने मोबाईलवर पॉर्न सुरू केले आणि अश्लील चाळे करू लागला. बाजूने दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिला प्रवाशाने सिग्नलवर थांबलेल्या रिक्षातील प्रकार पाहून सुकन्या यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चालकाच्या मोबाईलवर अश्लील कंटेंट सुरू असल्याचे त्या महिलेने निदर्शनास आणून दिले. सुकन्या यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे लक्षात येताच चालकाने घाईघाईत मोबाईल बाजूला ठेवला. मात्र, चालक रिक्षा चालवताना अश्लील व्हिडीओ पाहत होता आणि अश्लील कृत्य करत होता हे सुकन्या यांच्या लक्षात आले.
लोक महिलांना सहज विचारतात, ‘तुम्ही गाडीतून उतरून का गेला नाहीत?’ पण एका स्त्रीच्या दृष्टीने विचार केल्यास, अनोळखी रस्त्यांवर उतरण्यापेक्षा सुरक्षित गर्दीच्या ठिकाणी जाणे हाच पर्याय वाटतो. महिलांना प्रत्येक क्षणी सुरक्षेचे गणित मांडावे लागते, असे सुकन्या यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. हव्या त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अजून 30 मिनिटांचा प्रवास बाकी होता आणि रस्ताही अनोळखी होता. अशा परिस्थितीत मध्यरात्री अनोळखी रस्त्यावर उतरणे अधिक धोकादायक ठरू शकले असते, हा धोका ओळखून सुकन्या यांनी रिक्षातच राहून सुरक्षित आणि गर्दीचे ठिकाण येईपर्यंत प्रवास पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
प्रवासादरम्यान त्यांनी तत्काळ रेपिडोच्या सुरक्षा टीमशी संपर्क साधून चालकाच्या कृत्याची माहिती दिली आणि स्वतः असुरक्षित असल्याचे सांगितले. मात्र, प्रवास सुरू असताना कंपनीच्या टीमकडून कोणताही तात्काळ प्रतिसाद मिळाला नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
चालकाचा कॅमेऱ्यासमोर कबुलीचा प्रयत्न
सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर सुकन्या यांनी चालकाला कॅमेऱ्यासमोर जाब विचारला. तेव्हा चालकाने व्हिडिओ पाहिल्याचे नाकारले नाही; उलट आपण फक्त छोट्या कपड्यांमधील महिलांचे विदेशी व्हिडिओ पाहत होतो, असा अजब आणि निर्लज्ज युक्तिवाद केला. दरम्यान, सुकन्या यांनी वेळेवर सावध करणाऱ्या त्या अज्ञात महिला दुचाकीस्वाराचे आभार मानले आहेत. दुसरीकडे या घटनेचा व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेपिडो कंपनीवर चौफेर टीका झाली. त्यानंतर कंपनीने अधिकृत स्पष्टीकरण दिले आणि गैरवर्तनाचा ठपका ठेवत संबंधित रिक्षा चालकाला रेपिडो प्लॅटफॉर्मवरून कायमस्वरूपी हटवले आहे. तसेच प्रवाशाला आलेल्या अत्यंत वाईट अनुभवाबद्दल कंपनीने जाहीर माफी मागितली आहे.



























































