
आखातातील वाढत्या तणावाच्या आणि जागतिक कच्च्या तेलाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधन निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स पुन्हा एकदा वाढवला आहे. हे नवीन दर 3 ऑगस्टपासून लागू करण्यात आले असून देशांतर्गत इंधनावरील करांमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वित्त मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना जारी केली असून दर 15 दिवसांनी होणाऱ्या या आढाव्यात पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरील शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
नव्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलच्या निर्यातीवर लागू असलेला 2.5 रुपये प्रति लिटरचा दर आता वाढवून 3.5 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे, तर डिझेल निर्यातीवरील शुल्क 15.5 रुपयांवरून थेट 25.5 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. दुसरीकडे एटीएफ निर्यातीवरील शुल्क 14.5 रुपयांवरून 22 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. दिलासादायक म्हणजे देशांतर्गत वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील करात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे देशांतर्गत ग्राहकांसाठी इंधनाचे दर स्थिर राहतील. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
करातील वाढीमागील प्रमुख कारणे
- आखातातील संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा पुरवठा उपलब्ध राहावा.
- जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे तेल कंपन्यांनी देशांतर्गत पुरवठ्याऐवजी परदेशात इंधन विकून अवाजवी नफा कमावू नये.
एलपीजी सिलेंडरच्या दरात दिलासा
एकीकडे इंधन निर्यातीवर कर वाढवला असताना दुसरीकडे केंद्र सरकारने 1 ऑगस्टपासून व्यावसायिक एलपीजी (19 किलोग्रॅम) सिलेंडरच्या दरात कपात करून हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे. सलग दुसऱ्या महिन्यात हे दर कमी झाले आहेत. राजधानी दिल्लीत 19 किलोग्रॅमचा व्यावसायिक सिलेंडर 202 रुपयांनी स्वस्त झाला असून, आता त्याची किंमत 2728 रुपये झाली आहे.
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर
- दिल्ली – पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 95.20 रुपये
- कोलकाता – पेट्रोल 113.47 रुपये, डिझेल 99.82 रुपये
- मुंबई – पेट्रोल 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये
- बंगळुरू – पेट्रोल 111.68 रुपये, डिझेल 99.56 रुपये
- चेन्नई – पेट्रोल 107.76 रुपये, डिझेल 99.66 रुपये





























































