
राज्यात सर्वदूर पाऊस सक्रिय झाला असताना मुंबईसह संपूर्ण कोकण व पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली अशा 12 जिह्यांत गुरुवार 6 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे. मात्र नाशिक, अहिल्या नगर, खान्देश, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशीम, यवतमाळ व संपूर्ण मराठवाडा या ठिकाणी मात्र पावसाचा जोर कमी राहणार असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीलाच कसर भरून काढत संपूर्ण महिनाभर अनेक जिह्यांमध्ये जोर कायम राहिला आहे. मात्र ऑगस्ट सुरू होताच काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी सूर्यदर्शन अशी स्थिती आहे. मात्र सद्यस्थितीत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने 12 जिह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. यानुसार संपूर्ण मराठवाडा, सोलापूर आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा व गडचिरोली अशा 16 जिह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषतः 15 ऑगस्टनंतर 30 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
15 ऑगस्टनंतर राज्यभर धुमाकूळ
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने 15 ऑगस्टनंतर राज्यातील विविध जिह्यांत पाऊस धुमाकूळ घालेल असा अंदाज हवामान तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत बळीराजाला शेतीची कामे उरकण्यास अवधी मिळणार आहे. तर 16 व 17 ऑगस्ट रोजी बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मुसळधार पाऊस बरसेल.





























































