टर्ब्युलन्समुळे एअर इंडियाच्या फुकेट-दिल्ली विमानात गोंधळ; १२ प्रवासी जखमी, सूत्रांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुकेटहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला सोमवारी हवेत टर्ब्युलन्स सामना करावा लागला. यावेळी विमानातील किमान १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. विविध वृत्तांनुसार, टर्ब्युलन्सदरम्यान विमान सुमारे ३०० फूट खाली आले होते.

एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीत विमान ‘एआय २३७९’ सुरक्षितपणे उतरल्यावर प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप विमानातून बाहेर पडले. तसेच जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले.

‘आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हे एअर इंडियाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना आम्ही आवश्यक ती सर्व मदत पुरवत आहोत आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहोत’, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.