
रॅगिंगविरोधी कठोर नियम असतानाही ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या वसतिगृहात नववीच्या 20 हून अधिक विद्यार्थ्यांवर सिनिअर विद्यार्थ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी एसएसडी हायस्कूलच्या वसतिगृहात घडलेल्या या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ज्युनियर विद्यार्थ्यांनी सिनिअर विद्यार्थ्यांच्या रॅगिंग आणि छळाबाबत मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, इयत्ता दहावीच्या एका विद्यार्थ्याने इतर सिनिअर सहकाऱ्यांसोबत मिळून नववीच्या २० हून अधिक मुलांना एका खोलीत जबरदस्तीने बोलावले आणि त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने तसेच काठ्यांनी निर्दयीपणे मारहाण केली. या बेदम मारहाणीत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनेची गंभीर दखल घेत जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांना त्वरित माहिती देण्यात आली. या प्रकरणानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ पावले उचलत चौकशी सुरू केली असून, रॅगिंगच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ केल्याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक प्रताप चंद्र सौंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भविष्यात अशा घटनांवर नजर ठेवून तात्काळ प्रशासनाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
मुख्याध्यापक प्रताप चंद्र सौंता यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रशासनाला या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी मिळाली. रात्री उशिरा ही घटना घडल्यामुळे ती तातडीने उघडकीस आली नाही. माहिती मिळताच जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले आणि पालकांना कळवण्यात आले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेला विद्यार्थी शुभम नाईक याने शिक्षकांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. सिनियर विद्यार्थी बऱ्याच दिवसांपासून वसतिगृहात काठ्यांनी मारहाण करून छळ करत असल्याबाबत शिक्षकांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र शिक्षकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा शुभमने केला आहे.


























































