
विविध योजनांवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत असतानाच आदिवासीबहुल शहापूर तालुक्यात आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा उडाले आहेत. आरोग्य सेवेमध्ये रुग्णवाहिकांना महत्त्वाचे स्थान असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहापुरातील १०८ रुग्णवाहिका तर अक्षरशः ‘भंगारा’त गेल्या असून वाटेतच त्या बिघडतात. त्यामुळे रुग्णांचे प्राण कंठाशी आले आहेत. तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये फक्त चार सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध असून त्याही नीट चालत नाहीत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची फरफट होत असून महागड्या खासगी रुग्णवाहिका बोलवाव्या लागतात. आरोग्य यंत्रणेवर खर्च केलेले पैसे नेमके कोणाच्या घशात गेले, असा संतप्त सवाल शहापूरवासीयांनी केला आहे.
शहापूर तालुक्यातील १०८ रुग्णवाहिका नेहमी नादुरुस्त असतात, बरेच वेळा फोन करूनही त्या उपलब्ध होत नाहीत. अनेकदा तर डॉक्टरही नसतात. रुग्णवाहिकेत इमर्जन्सी किट, ऑक्सिजन सिलेंडर नसतात. त्यामुळे अतिगंभीर रुग्ण रुग्णालयात पोहोचण्याआधीच प्राण सोडतात. १०८ रुग्णवाहिकांबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणी दखल घेत नाही. इमर्जन्सी किटमध्ये ओ टू सिलेंडर, मॉनिटर, ईटीटी, लॅरिगोस्कोप, इमर्जन्सी औषधे यांचा अभाव असतो.
शहापूर तालुक्याच्या ९ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डोळखांब, शेंदरून, टाकापठार, टेंभा या चार ठिकाणी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत. कसारा, किन्हवली, शेणवा व वासिंद या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध असून अघई येथील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याची माहिती आरटीआयअंतर्गत देण्यात आली आहे.
युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा
रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तालुक्याला नवीन १०८ रुग्णवाहिका डॉक्टरसहित उपलब्ध करून द्याव्यात तसेच गोरगरीब रुग्णांचे जीव वाचवावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवा सेनेचे उपतालुका अधिकारी सागर बागुल यांनी दिला आहे.
१०८ रुग्णवाहिकांची वरिष्ठांकडे व संबंधित विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. जिथे या रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत तिथे इतर ठिकाणच्या रुग्णवाहिका देत आहोत.
> – डॉ. रमेश राठोड, (तालुका वैद्यकीय अधिकारी, शहापूर)


























































