रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण; महाडच्या एकनाथ मुकणे यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे विशेष निमंत्रण, आदिवासी समाजसेवेची राष्ट्रपतींकडून दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली वीसहून अधिक वर्षे रायगड जिल्ह्यातील आदिवासींसाठी काम करणारे समाजसेवक एकनाथ मुकणे यांना राजधानी दिल्लीत १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे विशेष निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली असून रायगड जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. देशभरातील निवडक मान्यवरांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रण पाठवले असून त्यात रायगडातील एकनाथ मुकणे यांचा समावेश असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एकनाथ मुकणे यांनी आदिवासी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करण्याचा निर्धार केला. त्यातून त्यांनी खैरे आदिवासी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची स्थापना केली. गेल्या दोन दशकांत या संस्थेच्या माध्यमातून शेकडो आदिवासी कुटुंबांना रोजगार, स्वयंरोजगार, बचत, मत्स्यव्यवसाय आणि आर्थिक स्वावलंबनाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. या कार्याला श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळ, सातारा या संस्थेचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सामाजिक कार्याचा गौरव

संस्थेचे सध्याचे प्रमुख राम कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली महाड शाखेचे व्यवस्थापक विठ्ठल कोळेकर यांनी आदिवासी मच्छीमार बांधवांसाठी विविध उपक्रम राबवण्यात पुढाकार घेतला. एकनाथ मुकणे यांच्या अविरत कार्यामुळे अनेक कुटुंबांचे जीवनमान उंचावले असून या सामाजिक कार्याचीच दखल राष्ट्रपतींनी घेतली. तसेच त्यांना दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे खास आमंत्रणदेखील दिले. हा सन्मान केवळ स्वतःचा नसून आदिवासी समाजाचा आणि श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळाच्या कार्याचा असल्याचे मुकणे यांनी सांगितले.