राहुल द्रविडप्रमाणेच अजिंक्य रहाणेलाही योग्य श्रेय मिळाले नाही; सुनील गावसकरांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunil-gavaskar-compares-ajinkya-rahane-captaincy-to-rahul-dravid-underrated-leadership-credit

हिंदुस्थानचा क्रिकटेपटू अजिंक्य रहाणे याने 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर अजिंक्य रहाणेच्या चांगल्या खेळींबद्दल, त्याच्या कारकिर्दीबद्दल बोललं जात आहे. हिंदुस्थानी क्रिकेटचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनीही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्याच्या कर्णधारपदाची तुलना राहुल द्रविडशी केली आहे.

‘कर्णधार म्हणून त्याची कामगिरी विलक्षण आहे. सहा कसोटी सामन्यांपैकी चार विजय आणि एकही पराभव नाही. राहुल द्रविडलाही कर्णधार म्हणून काही शानदार विजय मिळाले होते, पण त्याला त्याचे योग्य श्रेय कधीच मिळाले नाही. रहाणेच्या बाबतीतही तसेच झाले. त्याच्या नेतृत्वाला मिळायला हवी होती तितकी दाद कधीच मिळाली नाही. हिंदुस्थानच्या क्रिकेटमध्ये हे नेहमीच घडत आले आहे. संघ जिंकला की सर्व श्रेय फलंदाज किंवा गोलंदाज अशा वैयक्तिक कामगिरी करणाऱ्यांना दिले जाते; पण संघ हरला की त्याची जबाबदारी कर्णधार आणि प्रशिक्षकांवर टाकली जाते’, असे गावसकर यांनी मिड-डेमधील आपल्या सदरात लिहिले आहे.

‘२०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत हिंदुस्थानचा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपल्याने संघ पूर्णपणे खचला होता. अशा वेळी रहाणे आणि रवी शास्त्री यांनी मिळून संघाला पुन्हा उभारी दिली. उपकर्णधार असलेल्या रहाणेने बुडण्याच्या मार्गावर असलेल्या जहाजाची धुरा हाती घेतली. त्याने केवळ संघाला संकटातून बाहेर काढले नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या ‘द गब्बा’वर हिंदुस्थानला पहिला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि त्याचबरोबर मालिका विजयही मिळवून दिला. विशेष म्हणजे, मालिकेतील अखेरच्या कसोटीत अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे उपलब्ध नसतानाही हिंदुस्थानने कसोटी क्रिकेटमधील आपल्या सर्वात महान विजयांपैकी एक विजय मिळवला’, अशा शब्दात गावसकर यांनी रहाणेचे कौतुक केले.

हिंदुस्थानला अनेक दिग्गज आणि मार्गदर्शक ठरलेले कर्णधार लाभले आहेत. मन्सूर अली खान पतौडी आणि सौरव गांगुली यांसारख्या कर्णधारांनी हिंदुस्थानी क्रिकेटला नवी दिशा दिली. तर कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांसारख्या कर्णधारांनी आपल्या यशाने ट्रॉफ्यांचे कपाट भरून टाकले. याशिवाय एक तिसरा प्रकारही आहे—शांतपणे काम करणाऱ्या कर्णधारांचा. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी कोणताही गाजावाजा न करता पार पाडली आणि अपयशही क्वचितच पाहिले. अजिंक्य रहाणे हा अशाच प्रकारातील कर्णधार होता. त्याला कधीही नियमित कर्णधारपद मिळाले नाही, तरी त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने आपल्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय मालिकाविजयांपैकी एक विजय मिळवला.

अजिंक्य रहाणेने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानिमित्त हिंदुस्थानच्या क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘रहाणेच्या कारकिर्दीतील सर्वात सुवर्ण अध्याय २०२०-२१ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर-गावसकर करंडक मालिकेत लिहिला गेला. अॅडलेड येथील डे-नाईट कसोटीत हिंदुस्थानचा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपल्यानंतर संघ अत्यंत कठीण परिस्थितीत असताना रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या निर्बंधांमध्ये आणि आव्हानांमध्ये हिंदुस्थानी संघावर कोणाचाही विश्वास नव्हता. मात्र, रहाणेने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) शानदार शतक झळकावत मालिकेत बरोबरी साधली आणि संघाचे नेतृत्व सिद्ध केले’, असे बीसीसीआयने म्हटले.

‘त्यानंतर हिंदुस्थानच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान विजयांपैकी एक विजय हिंदुस्थानने मिळवला. रहाणेच्या शांत आणि संयमी नेतृत्वाखाली हिंदुस्थानने दुखापती, अनुभवाचा अभाव आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संस्मरणीय मालिका जिंकली. ब्रिस्बेनच्या ‘द गब्बा’ मैदानावरील ऐतिहासिक विजयासह ऑस्ट्रेलियाचा तब्बल ३२ वर्षांचा अभेद्य विक्रम मोडला गेला. रहाणेने हिंदुस्थानचे सहा कसोटी सामन्यांत नेतृत्व केले आणि कर्णधार म्हणून एकही सामना गमावला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने चार सामने जिंकले, तर दोन सामने अनिर्णित राहिले. त्याच्या नेतृत्वात स्पष्ट विचार, अचूक निर्णयक्षमता आणि सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची क्षमता दिसून आली’, असेही बीसीसीआयने नमूद केले.