
मुंबईतील मोक्याच्या मोकळ्या जागा बळकावणे आणि त्या आपल्याच पक्षातील लोकांच्या घशात घालण्याचं भाजपला अजबच खूळ लागलंय, असा हल्ला आज शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. याचसाठी ते मुंबईतील निवडणुका लढवत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला आहे. एकीकडे कॉन्व्हेन्शन सेंटरसाठी मुंबईतील एकमेव आर्टिफिशिअल टर्फ फुटबॉल मैदान बळकावून त्याला त्याच नेत्याचे नाव देण्याव्यतिरिक्त त्यांनी तब्बल १६ एकर जागा त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या एका सदस्याला भेट म्हणून दिली. यामध्ये आम्ही मुंबईकरांना खेळण्यासाठी बनवलेलं मैदान आणि ‘म्हाडा’चे दोन भूखंड फुकट दिले जाणार असल्याचा भंडाफोडही त्यांनी केला आहे. भाजपला फक्त मुंबईकरांकडून त्यांच्या हक्काच्या मोकळ्या जागा बळकावायच्या आणि त्या आपल्याच पक्षाच्या माणसांच्या स्वाधीन करायच्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबईकरांनो, रस्त्यावर उतरा
मोक्याच्या मोकळ्या जागा बळकावण्याचा प्रकार म्हणजे, ‘मुंबईचे नुकसान आणि स्वतःचा फायदा!’ असा आहे. याला आम्ही तीव्र विरोध करू. भाजपच्या राजवटीतील या उघड उघड जमीन हडपण्याच्या प्रकाराविरोधात सर्व मुंबईकरांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करू, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मोकळ्या जागा भाजपला वाटपाचे प्रकार मुख्यमंत्र्यांनी बंद केले पाहिजे. पण मला वाटते ते असं करणार नाहीत. कारण अशा प्रकारे जमीन बळकावून त्यांच्या पक्षाचाही फायदा होणार आहे.

































































