‘मसाप’मध्ये सपासप; योगेश सोमण यांच्या विरोधात अविश्वास ठराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल भारतीय साहित्य संमेलन दोन महिन्यांवर असताना महाराष्ट्र साहित्य परिषदेत (मसाप) गटबाजी उफाळून आली आहे. या गटबाजीतून आज स्थानिक कार्यवाह सुनील महाजन यांच्या नेतृत्वाखाली गटाने मसापचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करून घेतला. त्यामुळे वेगळ्याच वादाला तोंड फुटले असून दोन्ही गटांनी एकमेकांवर ‘सपासप’ आरोप केले.

अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची सभा शनिवारी माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडली. सभेचे कामकाज सुरू होताच सुनील महाजन यांनी अध्यक्ष सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाला उत्तर देण्याची मागणी केली. गोंधळ सुरू झाल्याने अध्यक्षांनी सभा तहकूब केली. त्यानंतर महाजन गटाने 21-0 अशा फरकाने अविश्वास ठराव मंजूर केला. त्यानंतर लगेचच नवीन पदाधिकाऱयांची निवड केली. त्यानुसार अध्यक्षपदी सुनील महाजन,  प्रमुख कार्यवाहपदी राजन लाखे आणि कोषाध्यक्षपदी उन्मेष गायधनी यांची निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीने नांदी संमेलन रद्द करण्याचा निर्णयदेखील जाहीर केला. तसेच शंभराव्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड केली

साहित्य संमेलनावर परिणाम होणार नाही!

महाराष्ट्र साहित्य परिषदेतील वादाचा शंभराव्या साहित्य संमेलनावर कुठलाही परिणाम होणार नाही. साहित्य संमेलन आणि मसापतील वाद या दोन स्वतंत्र बाबी आहेत. पुणेकरांना साहित्य संमेलनाची उत्सुकता असून वादाशी काही देणेघेणे नाही. या वादावर धर्मादाय आयुक्त कार्यालयात न्यायनिवाडा होईल, अशी भूमिका संमेलनाच्या निमंत्रकांनी मांडली.

 ठरावाच्या वैधतवेरून वाद?

ठरावाच्या वैधतेवरून दोन्ही गटात वाद सुरू झाला आहे. सोमण यांच्या गटाने ठरावाच्या वैधतेलाच आक्षेप घेतला आहे. अविश्वास ठराव सभेच्या पटलावर आलाच नाही. त्यामुळे तो मंजूर झाल्याचा दावा करणेच चुकीचे असून, हा ठराव बेकायदा आहे, असे योगेश सोमण म्हणाले. सुनील महाजन यांनी सोमण यांच्यावर सडकून टीका केली. गेल्या सात महिन्यांपासून प्रमुख पदाधिकाऱयांकडून कामात दुजाभाव केला जात होता. नांदी संमेलनाच्या निधीला आर्थिक मान्यता घेतली गेली नाही. एककल्ली पद्धतीने कारभार सुरू होता. संबंधित पदाधिकाऱयांची काम करण्याची पात्रता नसल्याची भावना झाल्यानेच हा निर्णय घ्यावा लागला, असे महाजन म्हणाले. या परस्परविरोधी दाव्यांमुळे मसापचा ताबा नेमका कोणाकडे, असा पेच निर्माण झाला आहे.