
मोदी-शहांच्या हिटलरशाहीविरुद्ध तरुण मुलांनी आव्हान उभे केलेच आहे. त्यामुळे संसदेत आणि रस्त्यावरही मोदी-शहांच्या विकतच्या बहुमताला कोणी विचारत नाही. आता बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल हा त्यांच्या भ्रष्ट, थुकरट सरकारविरुद्धचा कौल आहे. ‘पॅलेट गन’चा बदला जनतेने पोटनिवडणुकांच्या पराभवातून घेतला. मोदी-शहांच्या सैतानी राजकारणाच्या अंताची सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षाने अहंकार बाजूला ठेवला तर मोदी-शहांच्या हुकूमशाहीचा पराभव होईलच होईल!
‘जंतर मंतर’ आंदोलनाने मोदी सरकारची दाणादाण उडवली असतानाच तीन राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकालही भाजपच्या मनमानीला धक्का देणारे आहेत. बिहार आणि मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांत मोदी-शहांच्या मस्तवालपणाचा पराभव झाला, तर गुजरातच्या मांजलपूर विधानसभेची जागा भाजपने राखली आहे. हे निकाल म्हणजे भारतीय जनतेच्या मनात सुरू असलेल्या अस्वस्थतेचे प्रतिबिंब आहे. या तिन्ही पोटनिवडणुकांना ‘मिनी सार्वत्रिक निवडणुका’ किंवा ‘जनमनाचा आरसा’ म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. तरीही सध्याच्या राजकीय घडामोडींचे चित्र या निकालाने स्पष्ट केले आहे. बांकीपूर (बिहार) ही जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी रिक्त केली होती. नितीन नबीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले व त्यांचे बिऱ्हाड दिल्लीस हलले. त्यामुळे त्यांची निवड राज्यसभेवर झाली. बांकीपूरचा मतदारसंघ हा भाजपचा 1995 सालापासूनचा परंपरागत गड. येथे नितीन नबीन व त्यांच्या वडिलांनी किमान दहा निवडणुका दमदार पद्धतीने जिंकल्या. हा भाजपचा अभेद्य गड प्रशांत किशोर यांनी पाडला. येथे राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाला त्यांचाच गड राखता आला नाही हे महत्त्वाचे. हा संपूर्ण भाजपचा पराभव मानायला हवा. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी तर अशा गर्जना केल्या होत्या की, बांकीपुरात भाजपने एखादा कुत्रा किंवा मांजर उभे केले तरी येथील जनता त्यांना मतदान करील. मतदारांना ते गृहीत धरून चालले. मतदारांना त्यांनी वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला, तो अंगलट आला. या विजयाने प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला विधानसभेत स्थान मिळाले. तेजस्वी यादव यांना जनतेने नाकारले. कारण त्यांच्यात सातत्य नाही. दुसरे म्हणजे
जातीय राजकारणाला
बिहारची जनता विटली आहे. त्यांना शिक्षण, रोजगार यांची गरज आहे. बांकीपूर मतदारसंघात मुसलमान आणि यादव बहुसंख्य आहेत व त्यांनी राष्ट्रीय जनता दलाऐवजी प्रशांत किशोर यांच्यामागे उभे राहणे पसंत केले. बिहारच्या राजकारणातले हे परिवर्तन नवी दिशा देणारे आहे. नबीन यांच्या स्वागताच्या वेळी त्यांच्या काफिल्यासमोर ‘हनुमान’ नाचवण्याचा प्रकार रामभक्तांना आवडला नाही. राममंदिर लुटीच्या बातम्यांनी भाजपचा मतदार नाराज होताच. त्यात ‘जंतर मंतर’वरील ‘जेन झी’ आंदोलनामुळे बांकीपुरातील तरुण मतदारांनी भाजपचा बॅण्ड वाजवला. भाजपसाठी हा धडा आहे. प्रशांत किशोर यांना भाजपनेच जिंकवले व त्यांच्या विजयाने ‘जंतर मंतर’, राममंदिर लुटीसारख्या ज्वलंत विषयांवर थंड पाणी ओतले, असे विश्लेषण काही जण करू शकतात. त्यात दम नाही. बांकीपुरात घडले तेच मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात घडले. काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. ही जागा रिक्त झाली होती काँग्रेस आमदाराच्या अपात्रतेमुळे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला तरीही लोकांनी भाजपला झिडकारले. गुजरातच्या मांजलपूरची जागा भाजपने जिंकली यात नवल नाही, पण बांकीपूर, दतियात ‘बुंद से गयी वो हौद से नही आती’ अशी बेअब्रू भाजपची झाली. बिहारचे भाजपचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे गुन्हेगार आहेत. बिहारला एक शिक्षित मुख्यमंत्री हवा या प्रचारावर प्रशांत यांनी भर दिला, तो मतदारांनी मान्य केला. मध्य प्रदेश, बिहारात भाजप सत्तेवर असताना हा पराभव पत्करावा लागला. पोटनिवडणुकांच्या विजयास जनादेश मानता येणार नाही, पण भारतीय राजकारणात अनेक पोटनिवडणुकांनी ‘हवा’पालट केली आहे. 1988 मध्ये व्ही. पी. सिंह यांनी
अलाहाबाद पोटनिवडणूक
जिंकून काँग्रेसला पराभूत केले. या पोटनिवडणुकीत ‘बोफोर्स’चा मुद्दा गाजला. यातून काँग्रेसविरुद्धची हवा तापली आणि 1989 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला व आघाडी राजकारणाचे नवे युग देशात सुरू झाले. 2018 मध्ये गोरखपूर आणि फुलपूर या दोन जागांवरील पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला. योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर समाजवादी पक्षाने भाजपचे हे मजबूत गड जिंकले. त्यामुळे विरोधी पक्षांना आत्मविश्वास मिळाला. बांकीपूर आणि दतियातील भाजपच्या पराभवाने हेच आत्मविश्वासाचे बळ विरोधकांना दिले आहे. ‘जंतर मंतर’ येथील आंदोलकांवरील हल्ले व राममंदिर लुटीच्या प्रश्नावर भाजपचा आत्मविश्वास कोसळला आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांनी संसदेतून जवळ जवळ पलायन केले आहे. शहांनी देशातील बहुतेक सर्वच विरोधी पक्ष फोडले आहेत. प्रादेशिक पक्षांचे खासदार विकत घेऊन बहुमताचा पहाड निर्माण केला आहे. तरी विरोधी पक्ष त्यांच्या छाताडावर नाचत आहे. मोदी-शहांच्या हिटलरशाहीविरुद्ध तरुण मुलांनी आव्हान उभे केलेच आहे. त्यामुळे संसदेत आणि रस्त्यावरही मोदी-शहांच्या विकतच्या बहुमताला कोणी विचारत नाही. आता बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल हा त्यांच्या भ्रष्ट, थुकरट सरकारविरुद्धचा कौल आहे. ‘पॅलेट गन’चा बदला जनतेने पोटनिवडणुकांच्या पराभवातून घेतला. मोदी-शहांच्या सैतानी राजकारणाच्या अंताची सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षाने अहंकार बाजूला ठेवला तर मोदी-शहांच्या हुकूमशाहीचा पराभव होईलच होईल!

































































