नाशिकमध्ये सहा दिवसांत भूकंपाचे दहा धक्के, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
earthquake-measurement

राज्याच्या विविध भागांत भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रमाण वाढ आहे. मागील महिन्यात हिंगोलीत भूकंपाचे धक्के सतत जाणवले होते. आता नाशिकमध्ये मागील सहा दिवसांत दहा वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागाच्यावतीने राज्यातील मान्सूनच्या स्थितीचे सादरीकरण केले. त्यात भूकंपाच्या वाढत्या धक्क्यांची आकडेवारी सादर करण्यात आली. या आकडेवारीनुसार 28 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात नाशिकमध्ये नऊ वेळा भूकंपाचे धक्के बसले. त्यातील काही धक्के अगदी सकाळी साडे नऊ वाजता तर काही धक्के मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास बसले. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता सरासरी 2. 7 रिश्टर स्केल तर कमाल 3.9 रिश्टर स्केल होती. हे धक्के जमिनीपासून अगदी पाच फूट खोलीपासून दहा फूट खोलीवर नोंदवण्यात आले. भूकंपाच्या वाढत्या धक्क्यांमध्ये नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर याच काळात पालघरमध्ये दोन वेळ भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल होती. जमिनीपासून पाच फूट खोलीवर हे धक्के बसले. जुलै महिन्याच्या अखेरीस पालघरमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. पालघरमध्ये अरबी समुद्रात पाच किमी खोलीवर भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली होती.

मान्सूनच्या कालावधीत राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने योजण्यात येणाऱ्या उपाययोजनांचीही माहिती या वेळी देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) आणि राज्याच्या अखत्यारितील एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) राज्याच्या वेगवेगळ्या भागांत तैनात केले आहे. मुंबई शहरात एनडीआरएफच्या चार तुकडय़ा तर नागपूर आणि पुण्यात प्रत्येकी दोन तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी एक तुकडी तैनात केली आहे.

वीज कोसळून 53 मृत्यू

जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत वीज कोसळून तब्बल 53 जणांचा मृत्यू झाला आहे. भिंत पडून 35, झाड पडून 21, दरड कोसळून 7 जण मृत्युमुखी पडले. तर 21 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले.

7 ऑगस्टपर्यंत पाऊस

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर भागात सुरुवातीच्या दिवसात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.