
राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक गतिमान, सक्षम आणि अखंडित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल)च्या सहकार्याने राज्यातील 102, 108 तसेच इतर शासकीय रुग्णवाहिकांसाठी ‘कॅशलेस पेट्रोकार्ड’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 3195 रुग्णवाहिकांना पेट्रोकार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे चालकांना इंधनासाठी रोख रक्कम बाळगण्याची गरज राहणार नाही.
मुंबई येथील आरोग्यसेवा आयुक्तालयात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेचा लाभ अहिल्यानगर जिह्यातील 102 रुग्णवाहिकांनाही मिळणार आहे.
आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रुग्णवाहिकांसाठी सुरू करण्यात आलेले कॅशलेस पेट्रोकार्ड हे त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून, इंधनाअभावी रुग्णांना होणारा विलंब आणि गैरसोय आता थांबेल. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
एचपीसीएलच्या कोणत्याही पंपावर मिळणार इंधन
या योजनेअंतर्गत रुग्णवाहिका चालकांना एचपीसीएलच्या कोणत्याही अधिकृत पेट्रोल पंपावर पेट्रोकार्डच्या माध्यमातून थेट इंधन भरता येणार आहे. त्यामुळे रोख रकमेची अडचण, बिलांच्या प्रक्रियेमुळे होणारा विलंब आणि इंधन उपलब्धतेच्या समस्या दूर होणार आहे.
102 सेवा आता सर्वांसाठी खुली
यापूर्वी 102 रुग्णवाहिका सेवा मुख्यतः गर्भवती महिला व बालकांसाठी मर्यादित होती. आता ही सेवा राज्यातील सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच 102 सेवेला अधिक सक्षम करून ती 108 रुग्णवाहिका सेवेला प्रभावी पर्याय म्हणून विकसित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री आबीटकर यांनी सांगितले.
लोणी व्यंकनाथ दुर्घटनेनंतर घेतला निर्णय
अहिल्यानगर जिह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे शेततळ्यात पडून गंभीर जखमी झालेल्या दोन चिमुरडींना वेळेत 102 रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी रुग्णवाहिका सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी कॅशलेस पेट्रोकार्ड योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
रुग्णवाहिकांना इंधनाअभावी थांबावे लागणार नाही. कॅशलेस पेट्रोकार्ड योजनेमुळे रुग्णांना वेळेत सेवा मिळेल आणि राज्यातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होईल.
— प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री





























































