
भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱयांनाही आता अपघातापासून सुरक्षा कवच मिळणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आज सरकारने आणखी तीन वर्षांची मुदतवाढ दिली. या योजनेमध्ये शेतमजूर आणि महिला शेतकऱयांचाही समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी ही योजना शेतकऱयांच्या पुटुंबातील दोनच सदस्यांना लागू होती, आता ती पुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे. आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली.
रक्तस्राव, उष्माघाताचाही अपघातांमध्ये समावेश
अपघातामुळे झालेला अंतर्गत रक्तस्राव आणि उष्माघात या अपघातांचा योजनेत समावेश करण्यास मान्यता दिली. आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी दोन महिन्यांची मुदत राहणार आहे.





























































