
वाढीव घरपट्टीच्या निर्णयाविरोधात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि विविध संघटनांनी एकजूट दाखवत आज महापालिकेविरोधात एल्गार पुकारला. घरपट्टीविरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या विराट मोर्चात वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळेपर्यंत नवीन घरपट्टीची बिले भरणार नाही आणि महापालिकेशी असहकाराचे धोरण अवलंबले जाईल, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. प्रशासनाने निर्णय न घेतल्यास आमदार, खासदार, महापालिका पदाधिकारी व अधिकाऱयांच्या घरासमोर ‘झोपमोड आंदोलन’ छेडण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, आज सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांत कडकडीत बंद पाळण्यात आला.
आज सकाळी स्टेशन चौकातून सुरू झालेला मोर्चा राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ, गणपती मंदिर, कापड पेठ, हरभट रोडमार्गे महापालिकेसमोरून शाळा क्रमांक 1 समोरील मैदानावर पोहोचला. जाहीर सभेने आंदोलनाची सांगता झाली. मोर्चामुळे शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. यावेळी सतीश साखळकर, हणमंत पवार, समीर शहा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शंभूराज काटकर, सुदर्शन माने, प्रा. पद्माकर जगदाळे, दिगंबर जाधव, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे संजय बजाज, काँग्रेसचे नगरसेवक हर्षवर्धन पाटील, माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी, उद्योजक आणि हजारो नागरिक मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
जाहीर सभेत पालकमंत्री, आमदार, खासदार, भाजप नगरसेवक आणि महापालिका प्रशासनावर नागरिकांच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. कृती समितीचे निमंत्रक हणमंत पवार यांनी निवेदनातून वाढीव घरपट्टीतील कायदेशीर व तांत्रिक त्रुटींचा पाढा वाचत कर आकारणी प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा केला.
व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी व्यापारी, नागरिक आणि उद्योजकांची अभूतपूर्व एकजूट झाल्याचे सांगत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृती समितीशी चर्चा टाळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. वाढीव घरपट्टीला स्थगिती देऊन प्रतिनिधींना सहभागी करून समिती स्थापन होत नाही, तोपर्यंत घरपट्टी भरली जाणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सतीश साखळकर, शंभूराज काटकर यांनी महापालिका क्षेत्रात तीव्र असंतोष असल्याचे सांगत नागरिकांनी नव्या घरपट्टीच्या बिलांवर शंभर टक्के बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले.
‘महापालिका क्षेत्रातील 90 टक्के नागरिकांना वाढीव घरपट्टी मान्य आहे,’ या दाव्यालाही आंदोलनकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, आजचा बंद आणि हजारोंचा मोर्चा नागरिकांच्या रोषाचे उत्तर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



























































