दहाव्या वर्षी कॉलेजमध्ये गेला, 18 व्या वर्षी प्रोफेसर झाला; 306 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वय हे फक्त एक सांगण्याचा आकडा असतो, हे अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणाऱ्या नॅथन थॉमस या तरुणाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या 18 वर्षे आणि 346 दिवस वय असताना नॅथनने कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून पदभार स्वीकारला आणि जगातील सर्वात तरुण पुरुष प्रोफेसर होण्याचा ऐतिहासिक मान मिळवला. या अभूतपूर्व कामगिरीमुळे त्याने थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले असून 306 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

नॅथनची अभ्यासातील गती लहानपणापासूनच सर्वांना थक्क करणारी होती. अवघा 10 वर्षांचा असताना त्याने मियामी डेड कॉलेजमध्ये dual-enrollment द्वारे उच्च शिक्षणाचे धडे घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर वयाच्या 14 व्या वर्षी त्याने फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. पुढील चार वर्षांत अत्यंत मेहनतीने त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर आणि मास्टर अशा दोन्ही पदव्या सन्मानाने पूर्ण केल्या. इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात वाढलेल्या नॅथनच्या मनात गणिताची आवड निर्माण करण्याचे सर्व श्रेय तो आपल्या आईला देतो. हा कठीण विषयही आईनेच आपल्याला सोपा करून सांगितला असे तो म्हणतो.

ऑगस्ट 2023 मध्ये मियामी डेड कॉलेजने नॅथनची इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. तिथे तो विद्यार्थ्यांना ‘COP 2270: C For Engineers’ हा संगणकीय कोडिंग आणि प्रोग्रामिंगचा कठीण विषय शिकवू लागला. विशेष म्हणजे, ज्या वेळी त्याने वर्गात पाऊल ठेवले, त्यावेळी त्याला शिकवणारे अनेक विद्यार्थी हे त्याच्याच वयाचे किंवा त्याच्यापेक्षा मोठे होते. तरीही आपल्या अथांग ज्ञानाच्या जोरावर त्याने पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांवर आपली छाप पाडली.

दरम्यान, या नियुक्तीसह नॅथनने स्कॉटलंडचे प्रसिद्ध गणितज्ज्ञ कोलिन मॅक्लॉरिन यांचा 306 वर्षे जुना विक्रम मोडला. मॅक्लॉरिन हे 18 व्या शतकाच्या सुरुवातीला वयाच्या 19 व्या वर्षी प्राध्यापक बनले होते. याशिवाय 2008 मध्ये 18 वर्षे आणि 362 दिवसांच्या वयात जगातील सर्वात तरुण महिला प्रोफेसर बनलेल्या आलिया सबूरपेक्षाही नॅथन 16 दिवसांनी लहान आहे.

एकदा तुम्ही वर्गात प्रवेश केला की सगळेजण एकाच उद्देशाने तिथे आलेले असतात आणि तो म्हणजे शिक्षण घेणे. त्यामुळे तिथे वयाचा काहीही फरक पडत नाही. मी फक्त माझे काम प्रामाणिकपणे करण्याचा आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो, असे नॅथन म्हणाला. सध्या 21 वर्षांचा असलेला नॅथन ऑनलाइन शिकवणी चालू ठेवून युनिव्हर्सिटी ऑफ मियामी स्कूल ऑफ लॉ मधून कायद्याचे उच्च शिक्षण घेत आहे.