
देशात सध्या जे वातावरण आहे यावरून मोदींची लोकप्रियता आणि भाजपची लोकप्रियता ही किती घसरली आहे याचे बांकीपूर हे उदाहरण आहे असे म्हणत, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. जी जागा 95 पासून सलग आपण जिंकताय. आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची रिक्त जागा जी आधी 40 हजारांच्या फरकाने जिंकली होती. ती राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकले नाही? तर या तीन गोष्टी आहेत. जंतर मंतर जेन झी आंदोलन, राम मंदिराची लूट त्याच्यावर साधलेली चुप्पी आणि नितिन नबीन यांच्यासमोर त्यांच्या एका यात्रेत ज्या प्रकारे हनुमानाला नाचायला लावलं ही लोकांच्या हृद्यापर्यंत भिडलेली गोष्ट आहे. तुम्ही हनुमानाला नाचायला लावताय, तुम्ही राम मंदिर लुटताय, जेन झी वर गोळ्या झाडता या सर्व गोष्टींचा परीणाम मतदारांवर होत असतो. बिहारची जी जनता आहे त्यांच्या डीएनए मध्ये त्यांच्या मातीमध्ये राजकारण आहे.
आगामी काळातील विधानसभा निवडणुकांवर या निकालाचा परिणाम होईल का या माध्यमांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, अशा निकालांमुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढतो. पोटनिवडणुकांचा इतिहास पाहिला तर अलाहाबादच्या पोटनिवडणूकीमध्ये त्यावेळी व्हिपी सिंग जिंकले काॅंग्रेसचा पराभव केला आणि तिथून काॅंग्रेसच्या पतनाची सुरुवात झाली. त्यानंतर गोरखपूर आणि फुलपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हरला. तर अशा निकालांमुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढतो आणि तो अधिक जोमाने कामाला लागतो.
सरसंघचालक मोहन भागवत जेन झी सोबत संवाद साधणार आहेत. या माध्यमांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, ती संघनेत्यांची मुलं असतील किंवा नातवंडं असतील दुसऱ्या कुणाला बोलवणार? दुसरं कोण जाणार? भाजप नेत्यांची पोरं किंवा नातवंडं म्हणजे जेनझी नाहीत ना.. ती बधीर झालेली पिढी आहे. जेन झी म्हणजे कोण ज्या मुलांनी जंतर मंतरवर येऊन आंदोलन केलं. तुमच्या विरोधात घोषणा दिल्या लाठ्याकाठ्या खाल्या, अश्रूधूर सहन केला त्यांच्यापैकी दोन हजार लोकांना बोलवा आणि त्यांच्याशी संवाद साधा.
आज आमच्यासाठी सुप्रीम कोर्टातील खटला हा खूप महत्त्वाचा आहे. सुप्रीम कोर्टातील जजेसची संख्या वाढवण्याबद्दल, कोर्टामध्ये पार्लमेंटमध्ये काल एक बिल पास झालं लोकसभेला.. आमची अशी मागणी आहे भूमिका आहे. सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्यापेक्षा, सुप्रीम कोर्टात जे जजेस बसले आहेत त्यात जे बसले आहेत त्यांनी राजकीय दबावाखाली काम करू नये, तारखांवर तारखा देऊ नये आणि घटनात्मक विषयांबाबतचे खटले हे कालमर्यादेत सोडवावेत फास्ट ट्रॅकवर चालवावेत. आमचा खटला चार वर्ष चालला, पाच मुख्य न्यायाधीश बदलले लाज वाटली पाहिजे असे म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका केली.



























































