
काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल पद्मश्री ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन झाले आहे. मंगळवारी कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते.
डी. वाय. पाटील यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी म्हणून त्यांनी केवळ पदे भूषवली नाहीत, तर आपल्या विचारांनी, कर्तृत्वाने आणि समाजासाठी केलेल्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली. सत्तेपेक्षा समाजकारण आणि शिक्षणाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे, या विश्वासातून त्यांनी उभारलेल्या संस्था आज लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने घडवत आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला भक्कम पाया, सर्वसामान्य माणसाला संधी देण्याची त्यांची भूमिका आणि जनसेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा हीच त्यांची खरी ओळख राहील. त्यांनी उभा केलेला विचारांचा आणि कार्याचा वारसा अनेक पिढ्यांना दिशा देत राहील. डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन ही केवळ एका व्यक्तीची हानी नाही, तर समाजाभिमुख विचारांचा एक आधारवड हरपल्याची भावना आहे. त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती आणि माणसांवर असलेला विश्वास आम्हाला कायम प्रेरणा देत राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
डी. वाय. पाटील यांचा अल्प परिचय
- डी. वाय. पाटील यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935 रोजी झाला होता.
- 1957 ते 1962 दरम्यान त्यांनी कोल्हापूरचे महापौरपद भूषवले होते.
- 1967 ते 1978 या काळात ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.
- 1978 च्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांचा राजकारणातील रस कमी झाला आणि वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी त्यांनी राजकीय सन्यास घेतला.
- 1983 मध्ये त्यांनी नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली.
- राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत सरकारने डी.वाय. पाटील यांना 1991 साली पद्मश्री हा पुरस्कार दिला होता.
- पाटील यांनी त्रिपुरा (2009) आणि बिहारचे (2012) राज्यपालपदही भूषवले होते


























































