नीरजची आता डायमंड लीगमध्ये अग्निपरीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रासमोर आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वीच मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 21 ऑगस्टला होणाऱया लुसान डायमंड लीगमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आणि यंदाच्या हंगामातील अव्वल भालाफेकपटू श्रीलंकेचा रुमेश पथिरागे याच्याशी नीरजची थेट लढत होणार आहे. जगातील दिग्गज भालाफेकपटूंच्या उपस्थितीमुळे ही स्पर्धा अक्षरशः महासंग्राम ठरणार आहे.

ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हंगामातील सर्वोत्तम 85.83 मीटर भालाफेक करणाऱया नीरजसमोर यावेळी ऑलिम्पिक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम, विद्यमान विश्वविजेता त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशोर्न वॉलकाॅट, माजी विश्वविजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता झेक प्रजासत्ताकचा यापूब वॅडलेच, जर्मनीचा ज्युलियन वेबर, स्वित्झर्लंडचा सिमोन व्हीलँड आणि अमेरिकेचा कर्टिस थॉम्पसन अशी बलाढय़ फळी असणार आहे.

दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर नीरजची ही तिसरी स्पर्धा असेल. दोहा डायमंड लीगमध्ये तो 85.69 मीटर भालाफेकीसह चौथ्या स्थानावर राहिला होता. दुसरीकडे, पथिरागेने राष्ट्रकुल स्पर्धेत 89.75 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले, तर जूनमध्ये गोल्डन गाला स्पर्धेत 92.62 मीटरची दमदार भालाफेक करून आपली दावेदारी अधिक भक्कम केली. त्यामुळे आशियाई स्पर्धेपूर्वी नीरजला लुसानमध्ये स्वतःची ताकद सिद्ध करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.