
खरीप हंगामातील पेरणी होऊन सुमारे 20 दिवस उलटले असून, सततचे ढगाळ वातावरण आणि दररोज पडणाऱ्या हलक्या पावसामुळे सोयाबीन, बाजरी व मका पिकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर तणांची वाढ झाली आहे. तण नियंत्रणाचे मोठे आव्हान असून, ढगाळ वातावरणात फवारणी करावी की नाही, ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
यावेळी निंदणी, कोळपणी किंवा खुरपणी करणे आवश्यक असले, तरी मजुरांची कमतरता असल्याने ही कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी तणनाशक फवारणीकडे वळत आहेत. मात्र, प्रभावी फवारणीसाठी स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक असतो. सध्या सतत ढगाळ वातावरण असल्याने फवारणी करावी की नाही, या संभ्रमात शेतकरी आहेत.
अचानक येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे स्टिकरचा वापर करूनही तणनाशकांचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. दुसरीकडे, पाऊस नसताना जोरदार वारे वाहत असल्याने तणनाशक शेजारच्या पिकांवर जाऊन नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. तणनाशकांच्या वाढलेल्या किमती, फवारणीचा खर्च आणि मजुरीचा ताण यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत आहे. विशेषतः जिरायती भागातील शेतकऱ्यांना पुढील काळात वेळेवर पाऊस न झाल्यास केलेला खर्च वाया जाण्याची भीतीही सतावत आहे.
एकूणच हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणीबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी तज्ञांकडून करण्यात येत आहे.



























































