दारू माफियांनी दोघांना कारखाली चिरडले, आरोपींविरुद्ध कासा पोलिसांत गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कासा-चारोटी मार्गावरील कुरेशी दरबार हॉटेलजवळ दारू माफियांच्या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोघा तरुणांना चिरडले. अंगावर कार घालून आरोपी पसार झाले. ही घटना सोमवारी रात्री सुमारे ८ वाजता घडली. याप्रकरणी कासा पोलिसांनी कारचालक बिलाल आणि अक्षय शिरसाट (रा. महिर, ता. साक्री, जि. धुळे) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, अवैध दारू वाहतूक आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

संदेश कवले, आशिष गणेशकर, मनीष कांबेरा, नितेश बुंधे, मयूर कांबेरा, शलाका खंडाले हे मित्र कुरेशी दरबार हॉटेलजवळ गप्पा मारत उभे होते. याचवेळी बिलाल आणि अक्षय शिरसाट चारोटीकडून कासाकडे अवैध दारू वाहतूक करत होते. त्यांच्या भरधाव कारने तरुणांना धडक दिली. या धडकेत संदेश कवले व मयूर कांबेरा हे जखमी झाले असून त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. उपस्थित मित्रांनी कार थांबवण्याचा प्रयत्न करत आरडाओरडा केला असता चालकाने त्यांच्या अंगावरही कार घालण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वजण वेळीच बाजूला झाल्याने मोठी जीवितहानी टळली.

घटनेनंतर आरोपी कारसह कासाच्या दिशेने पळून जात असताना दीपू गॅरेजसमोर कारचा अपघात झाला. त्यामुळे चालक वाहन सोडून पसार झाला.