
आधीच दहशतवादी कारवायांनी ग्रासलेल्या जम्मू-कश्मीरला पहलगाम हल्ल्यामुळे आणखीनच फटका बसला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी जम्मू-कश्मीरकडे पाठ फिरवली आहे. 2025 मध्ये जम्मू-कश्मीरमधील परदेशी पर्यटकांसह देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे.
2025 मध्ये जम्मू आणि कश्मीरमधील पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. 2022 च्या तुलनेत, 2025 मध्ये राज्यात येणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत अंदाजे 23 टक्के घट झाली, तर परदेशी पर्यटकांच्या संख्येत 44 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेतील एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.
गेल्या दशकात दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्यामुळे आणि बदलत्या परिस्थितीमुळे जम्मू -कश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत होती. मात्र, गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांचा उत्साह पुन्हा मावळला.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये कश्मीरला भेट देणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांची संख्या 11.3 दशलक्षांपेक्षा जास्त होती, तर परदेशी पर्यटकांची संख्या केवळ 2000 होती. त्यानंतर 2022 मध्ये या संख्येत वाढ होऊन देशांतर्गत पर्यटकांची संख्या 63.49 टक्क्यांनी वाढून 18.4 दशलक्षांपेक्षा जास्त झाली. तर परदेशी पर्यटकांची संख्या 20,000 वर पोहोचली.
2023 मध्ये प्रथमच जम्मू कश्मीरमध्ये एकाच वर्षात 20 दशलक्षाहून अधिक पर्यटक आले. 2024 मध्ये देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. देशांतर्गत पर्यटकांची संख्या 23 दशलक्षांवर पोहोचली, जी 11.29 टक्क्यांची वाढ होती, तर परदेशी पर्यटकांच्या संख्येत 18.18 टक्क्यांची वाढ दिसून आली.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे 2025 मध्ये पर्यटकांची वाढती संख्या थांबली. या भीषण हल्ल्यानंतर, देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही पर्यटकांनी जम्मू-कश्मीरकडे पाठ फिरवली. यामुळे देशांतर्गत पर्यटकांच्या आगमनात जवळपास 23 टक्के घट झाली, ही संख्या 23 दशलक्षवरून 17.7 दशलक्ष झाली. परदेशी पर्यटकांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली. ही संख्या 65,000 वरून 36,000 पर्यंत, म्हणजेच 44.62 टक्क्यांपेक्षा जास्त घटली.



























































