
क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एका खेळाडूने रागाच्या भरात चेंडूला लाथ मारली आणि विरोधी संघाच्या फलंदाजाला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अजब पद्धतीने धावबाद केले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये मंगळवारी न्यू दिल्ली टायगर्स आणि आऊटर दिल्ली वॉरियर्स संघात सामना रंगला होता. 15 षटकांच्या या लढतीत दिल्ली वॉरियर्सला शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी फक्त एक धाव हवी होती. स्ट्राईकवर प्रथम सलुहा हा फलंदाज होता. त्याने चेंडू समोरच्या बाजुला टोलवला आणि दोन्ही फलंदाज धाव घेण्यासाठी पळाले.
मिड ऑफला न्यू दिल्ली टायगर्सचा कर्णधार हिंमत सिंह उभा होता. चेंडू त्याच्या बाजूला येत होता. त्यानेही वेगाने धाव घेत चेंडू पकडून थ्रो करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या हातातून निसटला. आपल्या हातून फलंदाजाला धावबाद करण्याची संधी गेली आणि सामना गमावतोय असे वाटताच हिंमत रागाने चेंडूला लाथ मारतो. त्यानंतर चेंडू वेगाने स्टंपवर आदोळला. तोपर्यंत प्रथम सलुजा क्रीझमध्ये पोहोचला नव्हता आणि तो धावबाद होतो. यामुळे सामना बरोबरीत सुटतो आणि त्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात येते.
What a run out by Himmat Singh 💥
A run out,out of nowhere in Delhi Premier League pic.twitter.com/sqVDV5ieSo— StrangerMan (@_StrangerMan7) August 4, 2026
हिम्मतने फलंदाजीतही दाखवली चमक
प्रथम सलुजा धावबाद झाल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. मात्र, सुपर ओव्हरमध्ये आऊटर दिल्ली वॉरियर्सने 20 धावा केल्या आणि न्यू दिल्ली टायगर्सला अवघ्या 6 धावांत गुंडाळून सामना जिंकला. त्यामुळे हिम्मत सिंगच्या या अजब रन आऊटचा संघाला अखेर फायदा झाला नाही. तत्पूर्वी, हिम्मतने फलंदाजीतही चमकदार कामगिरी करत 25 चेंडूंत 4 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 61 धावा कुटल्या होत्या.
आऊटर दिल्ली वॉरियर्सचे विजयाचे खाते उघडले
या विजयासह आऊटर दिल्ली वॉरियर्सने गुणतालिकेत आपले विजयाचे खाते उघडले आहे. पहिल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आणि सध्या ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, न्यू दिल्ली टायगर्सने 3 पैकी 2 सामने गमावले असून एका विजयासह ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. न्यू दिल्ली टायगर्सचा पुढील सामना 6 ऑगस्टला पुरानी दिल्ली विरुद्ध होणार आहे, तर आऊटर दिल्ली वॉरियर्सचा सामना 6 ऑगस्टलाच साऊथ दिल्ली सुपरस्टार्सशी होणार आहे.






























































