रुग्णालयाऐवजी थेट हॉटेल गाठले! IDFC बँक घोटाळ्यातील आरोपीला व्हीआयपी वागणूक; 2 पोलिसांसह 5 जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोट्यवधी रुपयांच्या आयडीएफसी बँक घोटाळ्यातील आरोपी विक्रम सिंह वाधवा याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी हॉटेलमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवू दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी चंदीगड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हॉटेलवर छापा टाकत दोन पोलिसांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून वाधवा याची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात आली. या प्रकारामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

सध्या कारागृहात असलेला आरोपी विक्रम वाधवा याने पोटाच्या संसर्गाची तक्रार केल्यामुळे त्याला पोलीस संरक्षणाखाली सेक्टर 16 मधील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, नियमांचे उल्लंघन करत पोलिसांच्या वाहनाने त्याला रुग्णालयात न नेता थेट सेक्टर 22 मधील एका हॉटेलमध्ये नेले. हे हॉटेल आरोपीच्या एका नातेवाईकाच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात असून, तिथे वाधवा याने आपली पत्नी आणि करण व कुणाल या दोन मुलांची भेट घेतली. या ठिकाणी ते सर्वजण एकत्र जेवण आणि विश्रांती घेत थांबले असताना, त्याबाबत एका जागरूक नागरिकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तात्काळ हॉटेलवर छापा टाकला आणि तिथे आरोपी, त्याचे कुटुंबीय व संबंधित पोलीस अधिकारी रंगेहात सापडले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी एसआय जगमेर सिंग, एएसआय सुरेश कुमार, विक्रम वाधवा यांची पत्नी आणि त्यांची दोन मुले करण व कुणाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांवर सेक्टर 17 पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला रुग्णालयाऐवजी थेट हॉटेलमध्ये नेण्याचा हा कट पूर्वनियोजित होता की वाटेत ठरवण्यात आले, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. न्यायालय आणि कारागृह प्रशासनाने केवळ उपचारासाठी परवानगी दिली असताना, कोणाच्या सांगण्यावरून त्याला हॉटेलमध्ये नेण्यात आले याबाबत अधिक तपास सुरू आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलीस आता हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज, प्रवेश नोंद वही, मोबाईल फोनचे लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासत आहेत. आरोपी हॉटेलमध्ये असताना इतर कोणाला भेटला का आणि तिथे नेमका किती वेळ थांबला, याची पडताळणी केली जात आहे. हॉटेलवर छापा टाकणारे डीएसपी सुखविंदर पाल सिंग सोंधी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेचीही उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. संबंधित पोलिसांच्या ड्युटीवरील नोंदी, हालचाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणांची कसून तपासणी केली जात आहे. या चौकशीत नियमांचे उल्लंघन किंवा संगनमत स्पष्टपणे निष्पन्न झाल्यास दोषी पोलिसांवर कठोर विभागीय व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा डीएसपी सुखविंदर पाल सिंग सोंधी यांनी दिला आहे.