तेलकट कढई स्वच्छ करण्यासाठी काय करायला हवं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

स्वयंपाकघरात सतत वापरल्या जाणाऱ्या कढईच्या हँडलवर आणि तळाशी तेल, धूर आणि घाणीची जाड थर जमा होतो. सुरुवातीला ही घाण साध्या साबणाने निघते; मात्र कालांतराने ती अधिक चिकट आणि काळी होते. अशावेळी तासन्तास घासण्याऐवजी काही सोपे घरगुती उपाय करून पाहता येतात.

 

एका वाटीत दोन ते तीन चमचे बेकिंग सोडा घेऊन त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. तयार झालेली पेस्ट कढईच्या हँडलवर आणि चिकटपणा असलेल्या भागावर लावा. १५ ते २० मिनिटे तसेच ठेवून स्क्रबरने घासून घ्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

 

गरम पाण्यात दोन चमचे पांढरा व्हिनेगर आणि थोडे डिशवॉश लिक्विड मिसळा. हा उपाय कढईच्या बाहेरील भागावरील ग्रीस आणि घाण सैल करण्यासाठी वापरता येतो. काही वेळ भिजवल्यानंतर ब्रश किंवा स्पंजने साफ करा.

 

मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात तीन चमचे मीठ आणि डिटर्जंट मिसळा. कढईचा बाहेरील भाग या मिश्रणात काही तास भिजवून ठेवल्यास चिकट थर मऊ होण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर घासून स्वच्छ करा.

 

कढईच्या बाहेरील काळ्या भागावर थोडी पांढरी टूथपेस्ट लावून त्यात थोडा बेकिंग सोडा मिसळता येतो. काही मिनिटांनी स्क्रबरने घासून स्वच्छ करा.

 

मात्र कढईचा पृष्ठभाग कोणत्या धातूचा आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. नॉन-स्टिक कढईवर स्टील स्क्रबर किंवा अॅल्युमिनियम फॉइल वापरू नये. त्यामुळे तिचे कोटिंग खराब होऊ शकते. कोणताही उपाय करण्यापूर्वी कढईच्या निर्मात्याच्या साफसफाईच्या सूचनांकडे लक्ष द्या.