
स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही यवतमाळ तालुक्यातील हिवरी (हेटी) येथील यदुवंशी नंद गवळी समाजाला स्वतंत्र स्मशानभूमीची सुविधा मिळालेली नाही. त्यामुळे समाजबांधवांवर मृतदेह जंगलातील नाल्याच्या काठावर दफन करण्याची वेळ आजही येत आहे. अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा आणि सुरक्षित रस्ता नसल्याने प्रत्येक वेळी ग्रामस्थांना अत्यंत वेदनादायी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
यदुवंशी नंद गवळी समाज पारंपरिक दुग्धव्यवसाय करणारा भटक्या जमातीतील समाज आहे. गायी-म्हशींच्या पालनपोषणासाठी समाजबांधव गावाबाहेरील ‘हेटी’ वस्तीत वास्तव्यास आहेत. राहण्यासाठी जागा मिळाली; मात्र मृत्यूनंतर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने अनेक वर्षांपासून जंगलातील नाल्याच्या काठावरच दफनविधी करावा लागत आहे.
नाल्यातून, काट्याकुट्यातून मृतदेह नेण्याची वेळ
अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाणारा मार्गही अत्यंत धोकादायक आहे. नाल्यातून, पाण्यातून, काटेरी झुडपांतून आणि दगड-गोट्यांतून वाट काढत मृतदेह न्यावा लागतो. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास पूर ओसरेपर्यंत मृतदेह घरीच ठेवण्याची वेळ कुटुंबीयांवर येते. याच परिसरात काही वर्षांपूर्वी मधमाशांनी हल्ला केल्याची घटनाही घडली होती. या हल्ल्यात २० ते 25 जण गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने मोठी जीवितहानी टळली.
मोर्चे, निवेदने अन् मागणी मात्र प्रलंबित
या गंभीर प्रश्नाबाबत राष्ट्रीय नंद गवळी समाज संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. स्वतंत्र स्मशानभूमीसाठी मोर्चेही काढण्यात आले. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने समाजबांधवांमध्ये नाराजी आहे. मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्काराची सुविधा मिळत नसल्याने ही केवळ मूलभूत सुविधांची कमतरता नसून मानवी संवेदनांची उपेक्षा असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ‘जिवंतपणी जगण्यासाठी जागा मिळाली; पण मृत्यूनंतर सन्मानाने दफन होण्यासाठीही जागा नाही,’ अशी हतबल प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. हिवरी (हेटी) येथील यदुवंशी नंद गवळी समाजासाठी तातडीने स्वतंत्र स्मशानभूमी मंजूर करावी आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाण्यासाठी सुरक्षित व कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

























































