
मोदी सरकारची आर्थिक आणि रोजगार धोरणे देशाच्या रोजगार बाजाराला गंभीर संकटात ढकलत असल्याचा आरोप काँग्रेसने मंगळवारी केला आहे. देशातील तरुणांना केवळ सोशल मीडियावरील रिल्सची नाही, तर प्रत्यक्ष नोकऱ्यांची गरज असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. रोजगार परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि लक्ष विचलित करण्याच्या राजकारणावर भर देत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी’X वर एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये देशातील प्रमुख देशांतर्गत कंपन्या पूर्वीपेक्षा कमी लोकांची भरती करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, देशातील मोठ्या सूचीबद्ध कंपन्यांमधील नवीन भरतीचा वेग मंदावला असून, सेन्सेक्स-३० निर्देशांकातील ११ प्रमुख कंपन्यांमधील एकूण नवीन भरती २०२३-२४ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये २७ टक्क्यांनी घसरली आहे.
जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही जे वारंवार सांगत आलो आहोत, तेच आता खरे ठरत आहे. मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केले असून, त्याचा सर्वाधिक फटका तरुणांना बसला आहे.” गेल्या वर्षभरात देशातील पहिल्या ११ पैकी ९ कंपन्यांमध्ये नवीन नोकऱ्यांमध्ये झालेली २७ टक्क्यांची घट देशातील गंभीर रोजगार संकट दर्शवत असल्याचेही ते म्हणाले.
या समस्येवर तोडगा शोधण्याऐवजी हे अहंकारी सरकार अशी कोणती समस्या अस्तित्वात असल्याचेच नाकारत असल्याची टीका रमेश यांनी केली. ते पुढे म्हणाले की, “मोठ्या कंपन्यांची ही अवस्था असेल, तर मोदी सरकारच्या दिशाहीन ‘हम दो, हमारे दो’ धोरणांचा फटका सहन करणाऱ्या एमएसएमई क्षेत्राची भीषण परिस्थिती सहज लक्षात येऊ शकते.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडच्या इन्स्टाग्राम व्हिडीओजवर निशाणा साधताना रमेश म्हणाले की, “देशातील तरुण समजूतदार आहेत. केवळ रिल्स बनवून त्यांना खूश करता येणार नाही, तर त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे.”





























































