
आसाममधील नागाव जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कॅम्पमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. एका असिस्टंट सब-इन्स्पेक्टरने आपल्याच सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाला असून एक जवान गंभीर जखमी झाला आहे. सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्यानंतर या अधिकाऱ्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. टीव्ही९ भारतवर्षने यासंदभात वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, ही घटना मंगळवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास नागाव जिल्ह्यातील कटीमारी येथील ३४ व्या सीआरपीएफ बटालियनच्या कॅम्पमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, असिस्टंट सब-इन्स्पेक्टर बल्लानी प्रेमाबरम याने काही कारणावरून आपल्या सर्व्हिस रायफलमधून अचानक सहकाऱ्यांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली.
या भयंकर गोळीबारात सब-इन्स्पेक्टर रामनवल सिंग यादव आणि हेड कॉन्स्टेबल विष्णू प्रसाद बघेल यांचा मृत्यू झाला. तर एएसआय माने गोविंद श्रीपुल हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर हल्लेखोर बल्लानी प्रेमाबरम याने स्वतःवरही गोळी झाडून आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच नागावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबोतनी डोले यांच्यासह पोलीस पथक आणि सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कॅम्पचा ताबा घेतला असून फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जवानांच्या कुटुंबीयांना या घटनेची अधिकृत माहिती देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे.
दरम्यान, या जवानाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस आणि सीआरपीएफच्या अंतर्गत समितीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.




























































