
घरगुती भांडणातून एका महिलेने तिच्या दिराच्या 9 महिन्याच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकारामुळे बाळाचे ओठ चिकटल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बाळाची सानिया शेख, हाजी मलंग शेख आणि रियाज इमाम हाल्याळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील लोहगाव परिसरात अल्ताप शेख व त्याच्या भावाचे कुटुंब एकत्र राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. या वाादातूवन सानिया शेख हिने अल्ताफ शेख यांच्या 9 महिन्याच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक टाकले. काही वेळाने बाळ रडायला लागल्याने बाळाच्या आईच्या हा प्रकार लक्षात आला.
बाळाचे ओठ चिकटलेले असल्याने बाळाची आई घाबरली व त्यांनी तत्काळ तिच्या नवऱ्याला बोलावून घेतले. त्यांनी बाळाला रुग्णालयात दाखल केले व नंतर लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोहगाव पोलिसांनी सानिया शेखसह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच बाळावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.




























































