मुंबईतील मोकळ्या जागा बळकावून आपल्याच माणसांच्या घशात घालण्याचं भाजपला खूळ लागलंय – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी X वरून भाजप व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ”भाजपला मुंबईतील मोकळ्या जागा बळकावून आपल्याच माणसांच्या घशात घालण्याचं खूळ लागलंय”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

”मुंबईतील मोकळ्या मोक्याच्या जागा बळकावणे आणि त्या आपल्याच माणसांच्या घशात घालणे, याचं भाजपला एक अजबच खूळ लागलं आहे. याचसाठी ते मुंबईत निवडणुका लढवतात. एकीकडे कॉन्व्हेन्शन सेंटरसाठी मुंबईतील फुटबॉलचे एकमेव आर्टिफिशियल टर्फ मैदान बळकावून त्याला त्यांच्या एका नेत्याचे नाव देण्याव्यतिरिक्त, त्यांनी आणखी १६ एकर जागा त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या एका सदस्याला भेट म्हणून दिली आहे. यातलं एक मैदान क्रिकेटचं आहे, जे आम्ही आमच्या कार्यकाळात सर्व मुंबईकरांना खेळण्यासाठी बनवलं होतं आणि म्हाडाचे 2 भूखंड जे फुकट दिले जातील”, असे आदित्य ठाकरे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या सगळ्या प्रकाराला व भाजपच्या हडपण्याच्या प्रवृत्तीला आपण विरोध तर करूच सोबत सर्व मुंबईकरांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करू, असेही ते म्हणाले.

”त्यांना मुंबईकरांकडून मोकळ्या जागा हिरावून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याच माणसांच्या स्वाधीन करायच्या आहेत. हे अशाप्रकारचे वाटप मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रद्द केले पाहिजेत. पण मला वाटतं ते असं करणार नाहीत, कारण अशाप्रकारे जमीन बळकावून त्यांच्या पक्षाचाही फायदा होणार आहे… मुंबईचे नुकसान आणि स्वतःचा फायदा’, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.