आभाळमाया – अंतराळी ‘विक्रम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक n [email protected]

गेल्या 18 जुलैला ‘स्कायरूट एअरोस्पेस’ या खासगी कंपनीने विकसित केलेला ‘विक्रम-1’ हा प्रक्षेपक (रॉकेट) यशस्वीरीत्या अंतराळात झेपावला आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातही खासगी व्यावसायिक युगाची नांदी झाली. आतापर्यंत आपल्याला अमेरिकेतील एलॉन मस्क यांच्या ‘स्पेस-एक्स’ची चर्चा अनेकदा कानी पडत होती. खासगी अंतराळ उड्डाणाद्वारे अवकाश प्रवास आणि कालांतराने चंद्रावतरण, मंगळस्वारी अशा अनेक महत्त्वाकांक्षी योजना मस्क यांनी मांडल्या. आगामी काळात अमेरिका आणि चीनपाठोपाठ खासगी प्रक्षेपणाद्वारे अंतराळात खासगी आगमन करणारा हिंदुस्थान हा तिसरा देश ठरला आहे. त्याबद्दलची माहिती सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. या निमित्ताने सुरुवातीला आपल्या एकूणच ‘स्पेस रॉकेट’चा आढावा घेणं उचित ठरेल.

हिंदुस्थानी अवकाश संशोधनाचे जनक मानल्या गेलेल्या डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती 12 ऑगस्टला आहे. त्यांचा जीवनकाल अवघ्या 52 (1919 ते 1971) वर्षांचा होता. हिंदुस्थानच्या अंतराळ संशोधनाचा पाया घालणारी अहमदाबादची ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) ही संस्था पद्मविभूषण डॉ. विक्रम साराभाई यांनी 1947 मध्येच स्थापन केली आणि तिथे ‘कॉस्मिक रे’ (वैश्विक किरण) या विषयावर संशोधन सुरू झालं. आपल्या अल्पायुष्यात त्यांनी विज्ञान आणि कलेच्याही क्षेत्रातील विविध नामांकित संस्थांची स्थापना केली.

‘इस्रो’च्या स्थापनेतही (1969) त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ या संस्थेमधूनच ‘इस्रो’चा (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन-1962) जन्म झाला. अवकाशात कृत्रिम उपग्रह सोडण्याचं तंत्रज्ञान रशियाने 1957 मध्येच विकसित केलं होतं. त्यानंतर हा विक्रम साराभाई यांच्याच नेतृत्वात केरळमधील थुम्बा येथे ‘एक्वेटोरियल रॉकेट लॉचिंग स्टेशन’ची सुरुवात झाली. डॉ. साराभाई यांच्या संशोधन पथकाने अथक प्रयत्न करून अमेरिकन बनावटीच्या ‘नायके-अपॅची’ साऊंडिंग रॉकेटचं प्रक्षेपण थुम्बा येथून केलं. त्यानंतर आपलं स्वतःचं ‘स्पेस लॉचिंग वेहिकल’ तयार झालं आणि 18 जुलै 1980 या दिवशी ‘रोहिणी’ हा पहिला हिंदुस्थानी उपग्रह अवकाशात गेला. त्यानंतर बरोबर 46 वर्षांनी खासगी अवकाशी कंपनीचा ‘विक्रम-1’ अंतराळात पाठविण्यात आला. ही डॉ. विक्रम साराभाई यांना दिलेली वैज्ञानिक मानवंदना होती.

जगातील अनेक देशांचे कृत्रिम उपग्रह दुसऱ्या देशांमधल्या रॉकेट लॉचिंगद्वारा अवकाशात गेलेले आहेत. असे हजारो उपग्रह असून आपल्या ‘इस्रो’नेसुद्धा इतर देशांचे शेकडो उपग्रह अवकाशात धाडले आहेत. मात्र कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी जो सक्षम अग्निबाण (रॉकेट) लागतो तो बनवणं आणि उपग्रह कोणत्या कक्षेत सोडायचा त्यानुसार त्या रॉकेटच्या उड्डाणासाठीचं इंधन ठरवणं या महत्त्वाच्या आणि खर्चिक गोष्टी असतात.

काही उपग्रह पृथ्वीजवळच्या कक्षेत (लो-अर्थ ऑर्बिट’मध्ये (किंवा ऑर्बाइट) स्थिर करायचे असतात. काही त्यापेक्षा दुरून पृथ्वीची परिक्रमा करतात. काही यानं अनेक ग्रहांच्या कक्षेपार जातात. काही ‘प्रोब’ किंवा प्रायोगिक उपग्रह अवकाशातील ‘लॅगरॅन्ज’ बिंदूवर स्थिर ठेवायचे असतात तर काही भूस्थिर म्हणजे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरणाऱ्या वेगाशी तंतोतंत जुळणाऱ्या कक्षेत सोडायचे असतात. असे केल्याने ते आपल्या (किंवा ठरावीक) देशाच्या भूभागावरच सतत स्थिर राहून चोवीस तास सेवा देऊ शकतात. अशा विविध उपग्रहांसाठी जी रॉकेट्स वापरली जातात त्यांची क्षमता आणि इंधन यात तफावत असते. भूस्थिर कक्षेत उपग्रह सोडायचा तर तो सुमारे 36800 किलोमीटरपर्यंत न्यावा लागतो. त्यासाठी ‘क्रायोजेनिक इंजिन’चा वापर गरजेचा ठरतो. हे इंजिन इंधन क्रायोजेनिक किंवा थंड ठेवण्याची कामगिरी करते.

त्यामुळे उपग्रह बनवणाऱ्या हजारो कंपन्या असल्या तरी विशिष्ट जागेवरून उपग्रहाचे उड्डाण घडवणारा अग्निबाण-तळ किंवा रॉकेट लॉचिंग पॅडचा पसारा उभारावा लागतो. आपल्याकडे ‘थुम्बा’च्या प्रायोगिक यशानंतर श्रीहरिकोटाजवळच्या बंगालच्या उपसागरातील बेटावर इस्रोचा विशाल अग्निबाण-तळ आहे.

आपला ‘विक्रम’ आहे तो ‘स्कायरूट एअरोस्पेस’ या कंपनीने बनवलेल्या अग्निबाणाविषयीचा. (उपग्रह नव्हे रॉकेट) तो खासगी उद्योगाद्वारा निर्माण केलेला आहे. या प्रकारे खासगी उद्योगातून रॉकेटनिर्मिती करणारा हिंदुस्थान हा अमेरिका आणि चीननंतरचा तिसरा देश ठरला आहे. म्हणून या यशाचं अधिक काwतुक. अर्थात रॉकेटनिर्मिती करणाऱ्या खासगी संस्थांनाही, सरकारी मालकीची प्रचलित लॉन्च पॅड वापरावी लागतात. ‘विक्रम-1’चं अवकाशी अंतराळी ‘आगमन’सुद्धा (उपग्रह) श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण तळावरूनच झालंय. यापुढे जगभर अशा प्रकारच्या खासगीकरणाची स्पर्धाच होणार आहे.