
अनेकदा दैनंदिन जीवनातील छोट्या चुका पण आयुष्यात मोठं नुकसान करतात. अशीच एक चूक इटलीतील एका महिलेने केली. एका मेसेजमुळे 11 कोटींच्या लॉटरीचे तिकिट महिलेने थेट कचऱ्यात टाकले. मात्र पुढे जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दोन दिवस कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधमोहीम राबवत 11 कोटींचं तिकिट शोधलं.
दक्षिण इटलीतील बिटोंटो येथील एका महिलेने 10.9 कोटी रुपये (1 दशलक्ष युरो) लॉटरीचे तिकिट घेतले होते. एका दुकानात तिने आपले क्रमांक तपासले असता, ते तिकीट नॉन-पेयेबल असल्याचे तिला सांगण्यात आले; त्यानंतर तिने ते तिकीट फेकून दिले. दुकानातून घरी परतल्यावर, तिच्या कुटुंबातील एका सदस्याने ती लॉटरी जिंकल्याचे सांगितले. ती महिला तिच्या आवडत्या व्यक्तीशी संबंधित त्याच नंबरची लॉटरी घेत असे.
लॉटरी जिंकल्याचे समजताच महिला तातडीने पुन्हा दुकानात गेली. पण तिकीट आधीच फेकून दिले गेले होते आणि कचरा उचलून नेला गेला होता. तिकीट परत मिळवण्यासाठी महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी ‘SANB’ या कचरा व्यवस्थापन कंपनीचे प्रशासक रॉबर्टो निकोला टोस्कानो यांच्याशी संपर्क साधला. सुदैवाने, टोस्कानो आणि त्यांच्या टीमला संबंधित कचरा उचलणारा ट्रक शोधण्यात आणि थांबवण्यात यश आले.
कचऱ्यामध्ये घातक पदार्थ असण्याची शक्यता असल्याने, तो ट्रक एका विशेष कंपनीकडे नेण्यात आला. कर्मचाऱ्यांनी दोन दिवस कचऱ्याची कसून तपासणी केली आणि अखेरीस त्यांना हवे असलेले तिकिटही मिळाले.





























































