
मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने सरकारच्या फसव्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामांची पुन्हा एकदा पोलखोल केली आहे. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री (तत्कालीन उपमुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या कोठी-कोरणार पुलाचा काही भाग वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कोटय़वधी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
कोटय़वधी रुपये खर्चून गडचिरोलीतील कोठी-कोरणार पूल उभारण्यात आला. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सरकारने गाजावाजा करत थाटामाटात 15 ऑगस्ट 2023 रोजी फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केले होते. हा पूल आसपासच्या गावांना जोडणारा असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. त्या पुलावरून मोठय़ा प्रमाणात दळणवळण सुरू होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलाचा काही भाग जीर्ण होऊन कोसळला. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. अवघ्या तीनच वर्षांत या पुलाची अशी दयनीय अवस्था झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व पंत्राटदारावर कडक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी स्थानिकांनी केली आहे.






























































