वरळीतील शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण, संतप्त विद्यार्थ्यांनी केले आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी वसतिगृहाबाहेर जोरदार आंदोलन केले. समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वरळी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात शंभरहून अधिक विद्यार्थी राहतात. गेल्या सहा महिन्यांपासून येथील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. अनेक वस्तू एक्सपायरी झालेल्या असतात. वेळेवर जेवण न मिळणे, शासनाने आखून दिलेल्या सात दिवसांच्या मेनूच्या शेड्युलचे योग्य पालन न होणे अशा विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी वारंवार वसतिगृहाच्या प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलन केले.

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शिवसेना धावली

आंदोलनाबाबत समजताच शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी वसतिगृहात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवसेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी पोलिसांकडे केली. तसेच समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खैरनार यांच्याशी संपर्क साधून संबंधित कंत्राटदाराला तातडीने ब्लॅकलिस्ट करा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.