अंधेरी, जुहू येथील प्रस्तावित भूखंड वाटप रद्द करा! आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी (पश्चिम) आणि जुहू येथील सुमारे 16 एकरच्या 3 सरकारी भूखंडांचे केळवणी संस्थेला होणारे प्रस्तावित वाटप तत्काळ रद्द करावे, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हे भूखंड म्हणजे मोकळी मैदाने असून ती सर्वसामान्यांसाठी कायम खुली ठेवावीत, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अंधेरी (पश्चिम) व जुहू येथील 16 एकर क्षेत्रफळाचे तीन सार्वजनिक खुले भूखंड मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा यांच्या माध्यमातून श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेला देण्याचे प्रस्तावित आहे. पहिला 12 एकर क्षेत्रफळाचा भूखंड अंधेरी (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील आहे. दुसरा 2 एकर क्षेत्रफळाचा भूखंड डी.एन. नगर येथील म्हाडा सिमेंट गोदामाचा आहे. त्या ठिकाणी ‘एडय़ुटेनमेंट थीम पार्क’ विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. तिसरा 2 एकर क्षेत्रफळाचा भूखंड जुहू येथील लोकमान्य टिळक उद्यानाचा असून त्याचा वापर सध्या स्थानिक रहिवाशांकडून सार्वजनिक उद्यान व खुली मनोरंजनाची जागा म्हणून केला जात आहे, याकडे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

गुलमोहर एरिया सोसायटीज वेल्फेअर ग्रुप तसेच स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे या तिन्ही भूखंडांचे सार्वजनिक खुल्या जागांसाठी असलेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे आणि ते सर्वसामान्य नागरिकांसाठी विनामूल्य व निर्बंधरहित उपलब्ध राहावे, अशी ठाम मागणी केली आहे. या प्रकरणात आपण तत्काळ हस्तक्षेप करून या तिन्ही भूखंडांबाबत देण्यात आलेली ना-हरकत प्रमाणपत्रेही रद्द करावीत, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे.