
शिक्षणमहर्षी, डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे सर्वेसर्वा आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, विधानसभेचे माजी सदस्य, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ‘अमर रहे… जब तक सूरज चाँद रहेगा… दादा तेरा नाम रहेगा…’च्या अखंड घोषणा देत हजारो आबालवृद्धांकडून आपल्या लाडक्या दादांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
कसबा बावडा येथील निवासस्थानी मंगळवारी सकाळी वयाच्या ९१ व्या वर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने शिक्षण, आरोग्य तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्र हळहळले. काल सकाळपासून ते आज सायंकाळपर्यंत अंत्यदर्शनासाठी सर्वच क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची अखंड रांग लागली होती. आज सायंकाळी चारच्या सुमारास डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार येथून सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. मुख्य मार्गावरील रस्त्यांच्या दुतर्फा थांबलेल्या आबालवृद्धांसह गल्लोगल्लींतून फुलांचा वर्षाव आणि ‘डी. वाय. पाटील अमर रहे’ अशा घोषणा सुरू होत्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पॅव्हेलियन मैदानावर धार्मिक विधींनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


























































