अमित शहा तोंड का लपवत आहेत? संसदेत सलग तिसऱ्या दिवशी गदारोळ, इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांवरील निर्दयी हल्ला व राम मंदिर चोरीच्या मुद्दय़ावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी गदारोळ झाला. त्यामुळे आधी लोकसभेचे आणि नंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. याच मुद्दय़ावरून इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात मोर्चा काढला. अमित शहा तोंड का लपवत आहेत, असा सवाल यावेळी करण्यात आला.

 लोकसभेचे कामकाज सुरू होताच गोंधळाला सुरुवात झाली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काही मिनिटांतच कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेत थोडेफार कामकाज चालले. मात्र, विरोधकांकडून घोषणाबाजी सुरू होती. अमित शाह को सदन मे लाओ, चंदा चोरी का पैसा कहां गया, बीजेपी के दफ्तर में गया… अशा घोषणा देत विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभा दणाणून सोडली. त्यामुळे दोनदा कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ कायम राहिला. याच गोंधळात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची तरतूद करणारे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

मोर्चात महिला खासदारांचा आवाज

इंडिया आघाडीच्या खासदारांनी विविध मागण्यांसाठी संसद भवनातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून मकरद्वारापर्यंत मोर्चा काढला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चात महिला खासदार आघाडीवर होत्या. ‘चंदा चोर, गद्दी छोड… लड़कियों के ट्रोल कहा मिलेगे, बीजेपी के दफ्तर में… अमित शहा इस्तिफा दो…’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

ते मुके, बहिरे आहेत का?

‘अमित शहा आणि मोदी हे संसदेचा अनादर करत आहेत. ते सभागृहात येत नाहीत. ते निवेदन का करत नाहीत? ते मुके आहेत की बहिरे आहेत,’ असा संताप मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. ‘ही लोकशाही आहे. हुकूमशाही नाही. हा कोणाचा राजदरबार नाही. विद्यार्थ्यांवर हल्ले झाले असतील तर कोणीतरी आदेश दिलेच असतील ना. त्याची जबाबदारी घ्यायला हवी. हीच परंपरा आहे, असे प्रियांका म्हणाल्या.