
वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग या तिन्ही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवाशांना आता दरमहा 30 हजार रुपये भाडे मिळणार आहे. याच महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश गृहनिर्माण विभागाने म्हाडाला दिले आहेत. यापूर्वी बीडीडी चाळीतील रहिवाशांना म्हाडाकडून 25 हजार रुपये भाडे देण्यात येत होते.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे.
म्हाडाकडे संक्रमण शिबिराची कमतरता असल्यामुळे बीडीडी चाळीतील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरण करण्यासाठी दरमहा 25 हजार रुपये भाडय़ाचा पर्याय देण्यात आला आहे. 2022 सालापासून ते आजतागायत या भाडय़ात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सध्याची वाढलेली महागाई आणि त्यातच ठिकठिकाणी विकासकामे सुरू असल्याने एवढय़ा तुटपुंज्या भाडय़ात घर मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे भाडय़ाच्या रकमेत वाढ करण्यात यावी अशी मागणी रहिवाशांकडून जोर धरू लागली होती. शिवसेनेने यासंदर्भात म्हाडाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर भाडय़ाच्या रकमेत वाढ केल्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. या बैठकीत वरळी बीडीडी चाळ इमारत क्र. 1 मधील (डी, ई, एफ, जी आणि एच विंग) रहिवाशांच्या पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांवर सविस्तर चर्चा केली. प्रभादेवी सेंच्युरी मिल म्हाडा संकुलातील संक्रमण शिबिरातील रहिवाशांना होणारा अनियमित पाणीपुरवठा व अस्वच्छतेचा त्रास दूर करण्याबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
40 हजारांच्या मागणीवर शिवसेना ठाम
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना 30 हजार रुपये भाडे देण्याचे मान्य केल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी म्हाडाचे आभार मानले. मात्र महागाई पाहता भाडेकरूंना दरमहा 40 हजार रुपये भाडे मिळावे, या आमच्या मुख्य मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत, असेही ते म्हणाले.
























































