150 देशांचे ध्वज ओळखून सांगितल्याराजधानी , चिमुकल्या अंगदचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या 4 वर्षे 11 महिन्यांच्या अंगद तेजस पाटील या चिमुकल्याने 150 देशांचे राष्ट्रीय ध्वज ओळखून त्यांच्या राजधानींची नावे सर्वात वेगाने सांगण्याचा उल्लेखनीय विक्रम केला आहे. त्याच्या या कामगिरीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली असून, या विक्रमाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

अंगदने फ्लॅश कार्ड्सच्या माध्यमातून 150 देशांचे राष्ट्रीय ध्वज अचूकपणे ओळखले. त्यानंतर प्रत्येक देशाचे नाव आणि त्याची राजधानी अवघ्या 8 मिनिटे 20 सेकंदांत सांगत त्याने ही असामान्य कामगिरी केली. अंगद हा यवतमाळचे ख्यातनाम विधीज्ञ ॲड. जीवन पाटील यांचा नातू असून, ॲड. तेजस पाटील आणि ॲड. रोहिणी पाटील यांचा चिरंजीव आहे. त्याचे आई-वडील दोघेही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली करतात.

अंगदची ही पहिलीच उल्लेखनीय कामगिरी नाही. अवघ्या 3 वर्षे 3 महिन्यांच्या वयात त्याने 50 देशांचे ध्वज ओळखून त्यांच्या राजधानी सांगण्याचा विक्रम केला होता. आता त्याने त्याच कामगिरीत मोठी झेप घेत 150 देशांचे ध्वज आणि राजधानी सांगत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. लहान वयातच अंगदने विकसित केलेली विलक्षण स्मरणशक्ती आणि भूगोलाविषयीची आवड या कामगिरीतून अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे, त्याला भारतातील सर्व 54 भारतरत्न पुरस्कारप्राप्त मान्यवरांचीही ओळख आहे. त्यामुळे जागतिक भूगोलासोबतच भारतीय इतिहास आणि देशासाठी योगदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांविषयीही त्याची उत्सुकता दिसून येते.

अंगदच्या या असामान्य कामगिरीमुळे पाटील कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जिज्ञासा, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास लहान वयातही मुलांमध्ये असलेल्या क्षमतेला मोठी झेप देता येते, हे अंगदच्या यशाने दाखवून दिले आहे.