लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू असतानाच लोकप्रिय इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेक्सिकोमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. येथे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना एका लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सिनालोआ राज्यातील कुलियाकान शहरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण मेक्सिकोमध्ये खळबळ उडाली आहे. सेसर गॅस्टेलुम (César Gastélum) असे मृत इन्फ्लुएन्सरचे नाव असून, तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर अत्यंत प्रसिद्ध होता. त्याचे लाखो फॉलोअर्स होते आणि तो अनेकदा कॉमेडी तसेच प्रादेशिक संगीतावर आधारित व्हिडिओ बनवायचा.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री गॅस्टेलुम आपल्या दोन मित्रांसोबत कुलियाकान येथील पार्किंग परिसरामध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग करत होता. यादरम्यान, मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर बेछूट गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. धक्कादायक म्हणजे, ज्याठिकाणी ही हत्या झाली, ती जागा स्थानिक सरकारी वकिलांच्या कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर होती. या हल्ल्याचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मृत्यूच्या काही वेळापूर्वी गॅस्टेलुमने डोक्यावर पांढऱ्या रंगाची टोपी (सोमब्रेरो) घातली होती. मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यात सध्या ड्रग्ज माफियांच्या (कार्टेल) दोन गटांमध्ये वाद सुरू आहे. यातील एका गटाची ओळख पिझ्झा आणि दुसऱ्या गटाची ओळख या विशिष्ट टोपीशी जोडली गेलेली आहे. गॅस्टेलुमने आपल्या काही जुन्या व्हिडिओंमध्ये गुन्हेगारी गटांशी संबंधित असलेल्या ‘बेलिको’ या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे ही हत्या गुन्हेगारी टोळ्यांच्या वादातूनच झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लाउडिया शीनबाम यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश तपास यंत्रणांना दिले आहेत. सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, गॅस्टेलुमच्या निधनानंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांनी शोक व्यक्त केला असून, ज्याठिकाणी त्याची हत्या झाली, तिथे लोकांनी मेणबत्त्या लावून त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मेक्सिकोमध्ये सोशल मीडिया स्टार्सना टार्गेट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मे 2025 मध्ये जॅलिसको राज्यात व्हॅलेरिया मार्क्वेझ नावाच्या 23 वर्षीय ब्युटी इन्फ्लुएन्सरचीही अशाच प्रकारे लाईव्ह सुरू असताना हत्या करण्यात आली होती. तज्ज्ञांच्या मते, गुन्हेगारी टोळ्या सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तींचा वापर स्वतःच्या प्रचारासाठी किंवा धमक्या देण्यासाठी करतात. या वाढत्या हिंसेमुळे मेक्सिकोमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.