
नागपूरमधील 16 वर्षीय मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील 20 वर्षीय बीबीएचा विद्यार्थी असलेला आरोपी कोठडीत असताना विविध चैनीच्या वस्तूंची आणि पदार्थांची मागणी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने नाश्त्यासाठी पिझ्झा आणि रात्रीच्या जेवणात उत्तम जेवणाची मागणी केली आहे. तसेच लॉक-अपमध्ये जाड गादी, मऊ अंथरूण आणि तात्काळ कीटकनाशक फवारणीची मागणी करत तो कर्मचाऱ्यांकडे करत आहे. यासोबतच कोठडीतील अस्वच्छ भिंती आणि दुर्गंधीयुक्त शौचालयाबद्दल देखील त्याने तक्रार केली आहे.
मंगळवारी न्यायालयात आरोपीच्या वकिलाने पोलिसांवर मनमानी कारभाराचा आरोप केला, ज्यानंतर आरोपीने पोलिसांच्या चौकशीस साफ नकार दिला आहे. वैद्यकीय तपासणी आणि उपचारास नकार देणाऱ्या या आरोपीने आपला सेल फोन पासवर्ड तसेच 24 तासांच्या कैदेदरम्यान पीडितेकडून घेतलेला मोबाईल देण्यासही नकार दिला आहे. पोलीस डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न करत असताना आरोपी प्रश्नांना बगल देत असून, रात्रंदिवस अधिकाऱ्यांशी वाद घालत आहे. विशेष म्हणजे, बलात्कारासाठी तो 16 वर्षीय मुलीलाच जबाबदार धरत असल्याचा प्रकार पोलिसांनी सांगितला.
मंगळवारी विशेष न्यायाधीशांसमोर सुनावणीदरम्यान, पोलिसांवर रोख 70 हजार रुपये चोरल्याचा, मारहाण केल्याचा आणि चष्मे व बूट परत न दिल्याचा गंभीर आरोप आरोपीने केला होता. मात्र, आपला खोटा वृत्तांत तयार करण्यासाठी हा तरुण स्वतःलाच इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी स्पष्ट केले की, पोलिसांनी आरोपीला पूर्ण सहकार्य करून त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहेत, मात्र त्याच्या चैनीच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नाही. आरोपी चौकशीत टाळाटाळ करत असून पोलीस त्याचे सातत्याने समुपदेशन करत आहेत, तसेच तो कोणतेही आत्मघातकी कृत्य करू नये म्हणून अधिकारी त्याच्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.


























































